Headlines

Edelweiss Finance कडून कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंवर दबाव? पुराव्यांमुळं एकच खळबळ

[ad_1]

Nitin Desai Death Edelweiss Finance Controversy : चित्रपट कोणताही असो, सत्तेत कोणीही येवो सेट लागणार तो म्हणजे देसाईंचाच असंच समीकरण तयार झालं होतं. कालपरवापर्यंत आपल्यात असणारे नितीन देसाई आयुष्य संपवण्याचं पाऊल उचलतील अशी कोणालाही कल्पनाही नव्हती. पण, नियतीनं मात्र त्यांच्या आयुष्याचा प्रवास इथंच थांबवण्याचा निर्णय घेतला होता. देसाईंनी कर्जबाजारीपणामुळं आयुष्य संपवलं असं म्हटलं गेलं. 

तब्बल 252 कोटी रुपयांचं कर्ज असणाऱ्या देसाईंच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? हाच प्रश्न त्यानंतर उपस्थित करण्यात आला.  एडलवाईज फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी देसाईंवर दबाव आणला होता का? याबाबतची धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती लागली आहे. 

कर्जबाजारीपणामुळं शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उलचल्याच्या बातम्या आपण पाहतो. मात्र बॉलिवूडच्या एवढ्या मोठ्या कला दिग्दर्शकाला कर्ज फेडणं कठीण का झालं? आपल्या मेहनतीनं शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या देसाईंना टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? याबाबतची धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती लागली. 

कुटुंबीयांचे आरोप…

देसाईँना कर्ज देणारय्या एडलवाईज, ईसीएल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असा गंभीर आरोप देसाईंची पत्नी नेहा देसाई यांनी केला. नेहा नितीन देसाई यांनी रायगड जिल्ह्याच्या खालापूर पोलीस ठाण्यात गेल्या 4 ऑगस्टला तशी तक्रार दाखल केली. त्यानुसार खालापूर पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. 

नितीन देसाई यांनी ECL फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या दृष्टीनं फायनान्स कंपनीचे केयूर मेहता, एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा, एडलवाईज कंपनीचे अधिकारी स्मित शहा, EARC कंपनीचे अधिकारी आर. के. बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी एनडी स्टुडिओच्या कर्जाच्या वसुलीसाठी मयत देसाई यांना प्रचंड मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

FIR मध्ये नेहा देसाईंचे आरोप काय? 

एफआयआरनुसार, 2016 मध्ये एडलवाईज ग्रुपचे अधिकारी रशेष शाह यांनीच नितीन देसाईंना स्टुडिओमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार त्यांनी ECL फायनान्स कंपनीकडून 150 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. 2018 मध्ये आणखी 35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. त्याबदल्यात एनडी स्टुडिओ गहाण ठेवण्यात आला होता. ECL कंपनीनं सहा महिन्यांच्या कर्जाचे हप्ते आगाऊ भरण्यासाठी दबाव आणला. त्यामुळं देसाईंनी हिरानंदानी पवई इथलं स्वतःचं ऑफिस विकलं. पुढे फेब्रुवारी 2020 पर्यंत व्याजासह कर्जाच्या रकमेचे सगळे हप्ते भरले. मार्च 2020 पासून कोरोना महामारीमुळं सिनेमा, मालिकांचं शुटिंग बंद झालं आणि एनडी स्टुडिओही बंद पडला परिणामी कर्ज फेडण्यास विलंब झाला. 

नितीन देसाईंची कर्ज परतफेड करण्याची तयारी होती. त्यांनी वन टाइम सेटलमेंटचा प्रस्तावही दिला. मात्र केयूर मेहता आणि स्मित शहा यांनी त्यादृष्टीनं कोणतीही कार्यवाही न करता अचानक माझे पती यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबतची नोटीस पाठवून त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरूवात केली, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी नितीन देसाईंनी काही नव्या गुंतवणूकदारांची मदत घेण्याचं ठरवलं होतं. मात्र एडलवाईझच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही, असा आरोप देसाई कुटुंबियांनी केला. मागील 25 जुलैला NCLT अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादानं देसाईंना दिवाळखोर घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली. एनडी स्टुडिओ जप्त होण्याच्या भीती देसाईंना सतावत होती. अखेर 2 ऑगस्टला आत्महत्या करून त्यांनी आपलं जीवन संपवलं. 

नितीन देसाईंनी आत्महत्या करण्याआधी 11 ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करून ठेवले. त्यामध्येही या सगळ्या आरोपांचा उल्लेख असल्याचं समजतंय. दरम्यान, एडलवाईज कंपनीनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

एडलवाईज कंपनीचं काय म्हणणं? 

एडलवाईझ एआरसीनं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचं आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन केल्याचं स्पष्ट केलं. नितीन देसाईंकडून जादा व्याजदर आकारण्यात आला नव्हता आणि कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर कोणताही दबाव टाकलेला नव्हता, असा दावा कंपनीनं केला. कर्जवसुलीसाठी नियम आणि कायद्यांचं पालन करण्यात आलं, असंही कंपनीचं म्हणणं आहे.

एडलवाईझच्या या स्पष्टीकरणामुळं सत्य बदलणार नाही. नितीन देसाईंना आत्महत्या करावी लागली, हे कटू वास्तव आहे. देसाईंसारख्या व्यक्तीवर ही वेळ येत असेल तर सामान्य माणसांचं काय होत असेल?

दरम्यान, नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येतेय. एडलवाईज फायनान्स कंपनीच्या दोघांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाईंच्या तक्रारीनुसार आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा खालापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. नेहा देसाईंनी केलेल्या आरोपांना हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. एफआयआर रद्द करण्याची मागणी फायनान्स कंपनीच्या दोघांनी केलीय. 14 ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान खालापूर पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी पाच जणांना नोटीस पाठवली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *