Headlines

अमरावतीमध्ये कॉलराच्या उद्रेकाची शंका, चौघांचा मृत्यू, ३२२ जणांना लागण

[ad_1]

शैलजा तिवले

मुंबई : अमरावती जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाल्याचे आढळले आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२२ जणांना कॉलराची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यत सात ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा भागातील पाच डोंगरी आणि कोयलारी या दोन गावांमध्ये दुषित पाण्यामुळे कॉलराचा प्रसार झाला आहे. पावसामुळे गावातील सांडपाणी विहिरीमध्ये मिसळले आहे. या दुषित पाण्यामुळे दोन्ही गावांमध्ये कॉलराची साथ पसरली आहे. कॉलरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ३५ आणि २७ वर्षाच्या तरुणांचा तसेच ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोन्ही गावांमध्ये कॉलराचा उद्रेक ७ जुलैपासून सुरू झाल्याची माहिती अमरावतीच्या आरोग्य विभागाने दिली.

अमरावतीमधील नया अकोला भागातही सोमवारपासून कॉलराचा उद्रेक झाल्याची शंका आहे. या भागातील एका रुग्णाचा मृत्यू कॉलरामुळे झाला आहे. येथील १५ ते २० किलोमीटर परिसरामध्ये आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून रुग्णांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे अमरावतीच्या आरोग्य विभागाने सांगितले.

यावर्षी राज्यात सात ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात २०१९ आणि २०२० साली कॉलराचा उद्रेक झाल्याची नोंद नाही तर २०२१ मध्ये दोन ठिकाणी उद्रेक झाला होता. परंतु त्यावेळी शून्य मृत्यू नोंदले गेले.

अमरावतीत उद्रेक झालेल्या ठिकाणी घरोघरी प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप आणि पाण्याच्या स्वच्छतेसाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाच डोंगरी आणि कोयलारी या दोन्ही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असे अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमाळे यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये कॉलराचा उद्रेक झाल्याचा संशय आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठविले असून याचा अहवाल आल्यानंतरच कारण निश्चित होईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *