Headlines

Video : “आम्ही तुमच्या शब्दावर मतं दिली, धोतर फेडायचं काम…”, अजित पवारांविरोधात उघड नाराजी; नगरमध्ये ताफा अडवला!

[ad_1]

राज्यात निवडणुकांशिवायच सत्तापालट झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका प्रलंबित होत्या. मात्र, एकीकडे या निवडणुकांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे साखर कारखान्यांमधल्या निवडणुकांची देखील लगबग सुरू झाली आहे. अहमदनगरमधल्या अगस्ती साखर कारखान्याच्या निवणुका लवकरच होणार असून त्यासाठी सर्वच पॅनलकडून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मात्र, यामध्ये स्थानिक राजकारणात वेगळी समीकरणं समोर येऊ लागली आहेत. याचाच परिणाम म्हणून आज अहमदनगरमध्ये प्रचारासाठी गेलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा स्थानिक शेतकरी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. यावेळी अजित पवारांसमोरच विरोधी पॅनलच्या मधुकर पिचड यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.

नगरमध्ये नेमकं घडलंय काय?

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी आणि नंतर नगरमधील बरीच राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे पिचड पिता-पुत्र भाजपामध्ये सामील झाले. त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सीताराम गायकर देखील त्यांच्यासोबत भाजपामध्ये गेले. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार करताना अजित पवारांनी “विधानसभा निवडणुका होऊ द्या, गायकरांचं धोतरच फेडतो”, अशा आशयाचं विधान केल्याचं सांगितलं जातं. मात्र, आता पुन्हा एकदा समीकरणं बदलली असून सीताराम गायकरांची घरवापसी झाली आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते परतले आहेत. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पॅनलमधून ते कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहिल्यामुळे आता अजित पवार त्यांचाच प्रचार करण्यासाठी जिल्ह्यात हजेरी लावत आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे स्थानिक शेतकरी नाराज झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. अजित पवार आज अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीसाठीचा प्रचार करण्यासाठी नगरमधल्या अकोलेमध्ये पोहोचले असता तिथे त्यांचा ताफा अडवण्यात आला. यावेळी “धोतर फेडण्याचं काम आम्ही करतो. तुमच्या शब्दावर आम्ही मतं दिली. किरण लहामटे यांना प्रचंड मतांनी निवडून दिलं”, अशा शब्दात अजित पवारांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, त्यांच्यासमोरच विरोधी पॅनलमधील मधुकर पिचड यांच्या नावाने जयजयकाराच्या घोषणा देखील करण्यात आल्या.

दरम्यान, अजित पवार गायकरांच्या प्रचारासाठी अकोलेमध्ये येत असताना भाजपाकडून खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष भांगरेंनी टीका केल्याचं वृत्त टीव्ही ९ नं दिलं आहे. अजित पवारांनी गायकरांचं धोतर फेडण्याची भाषा केली होती. आता तेच अजित पवार गायकरांना धोतर नेसवण्यासाठी येत आहेत का? असा खोचक सवाल भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *