Headlines

सांगलीतील गांजा लागवडीमागे संघटित शक्ती?

[ad_1]

दिगंबर शिंदे

सांगली : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिरज तालुक्यातील शिपूर येथे एका उसाच्या फडामध्ये केलेली गांजा लागवड उघडकीस आणली आहे. या शेतातून सुमारे एक कोटींचा गांजा जप्त करण्यात आला असून जिल्ह्यात सर्वात मोठा गांजा पकडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही तरुण पिढीला व्यसनाधीन करणारी गांजा लागवड आता राजरोस शेतकरी करू लागले आहेत की यामागे संघटित शक्ती कार्यरत आहे, याचा शोध केवळ उत्पादन शुल्क विभागानेच नव्हे तर पोलिसांनीही घ्यायची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरजेपासून २० किलोमीटर अंतरावरील शिपूर या गावच्या हद्दीमध्ये गांजा लागवड उघडकीस आली. शेती करणे सध्या आतबट्टय़ाचा धंदा झाला आहे. भाजीपाला केला तर बाजारात मालाला ग्राहकच न मिळणे, उत्पादन खर्चाशी निगडित दर न मिळणे, औषधाबरोबरच मेहनत, मजुरीचा वाढता खर्च यामुळे शेती व्यवसाय परवडत नाही. याच्या जोडीलाच निसर्गाचा लहरीपणाही शेती आतबट्टय़ात आणणारा ठरला आहे. यातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येत असून सावकारीच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकत चालला आहे. यातूनच झटपट पैसा मिळवण्यासाठी हतबल शेतकऱ्यांना हाताशी धरून अशा प्रकारचे उद्योग समाजकंटकांकडून केले जात आहेत का, याचा शोध घ्यायला हवा.

जिल्ह्याच्या ठिकाणापासून शंभर किलोमीटर अंतरावरील जत तालुक्यात गांजा लागवड यापुर्वी उघडकीस आली असून आतापर्यंत पोलिसांनी कारवाई करून लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असला तरी हे प्रकरण याहून गंभीर आहे. कारण या ठिकाणी गांजा लागवड जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे आढळून आले आहे. झाडांच्या पानांची तोडणी वरचेवर करण्यात आल्याने खोड मोठे झालेले आढळून आले असून पाऊण एकर उसामध्ये असलेल्या गांजाची झाडे कटरने कापावी लागली. याचा अर्थ बराच काळ या ठिकाणाहून गांजाचे उत्पादन घेतले जात असावे अशी शंका घेण्यास वाव आहे. उत्पादन शुल्क विभागाने गांजाचे बुंधे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून यावरून झाडांचे वय लक्षात येणार आहे.

गांजा वनस्पती झेंडूसारखी असली तरी नशा करणाऱ्यांसाठी स्वस्त ठरते. सांगली, मिरज शहरात नशेसाठी तरुणांकडून गांजाचा वापर वाढला आहे. मिरज रेल्वे स्थानकाचा परिसरच नव्हे तर बहुसंख्य ठिकाणी दोन-चार ग्रॅमची गांजापूड विनासायास मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. पन्नास रुपयांमध्ये गांजा पुडी मिळत असल्याने नशेखोरांना स्वस्त वाटते. याची विक्री करणारी यंत्रणा बेमालूमपणे नशेचे विष समाजात विकत आहे. पोलीस यंत्रणेच्या अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिचून गांजा विक्री चालू असते. यंत्रणेच्या ताब्यात सापडतात ते गांजाचे सेवन करणारे. मात्र, मुख्य सूत्रधार नामानिराळाच राहतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे.

गांजाची नशा करणारे तरुण अधिक आक्रमक होतात. यातून मिरज रेल्वे स्टेशन परिसरात सर्वसामान्य नागरिकांवर जीवघेणे हल्लेही झाले आहेत. पोलिसांनी गजाआड केले की आत्महत्येचा प्रयत्न या नशेखोरांकडून होत असल्याने कारवाईही टाळली जाते. यामुळे नशेखोरांचे आणि या व्यवहारात गुंतलेल्यांचे फावते आहे. यातील पाळेमुळे खणून काढण्याची गरज समाजाच्या हिताची आहे. मात्र, यातून मिळणारा पैसा संघटित गुन्हेगारीला पोषक ठरत असल्याने समाजालाही घातक ठरणारे आहे.

ओल्या गांजाचा दर प्रति किला दहा हजार रुपये असून वाळलेला तयार गांजा वीस हजार रुपये किलो दराने विकला जातो. शिपूर येथे तब्बल एक हजार ५० किलो गांजा जप्त करण्यात आला. झाडे जुनाट असल्याने यापुर्वी हा गांजा खरेदीदार कोण होते, त्याचा पुरवठा कोणाला केला गेला, याची माहिती तपासात पुढे येईलच. पण यासाठी तपास यंत्रणांची इच्छाशक्ती हवी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग पहिल्यांदाच या कारवाईमध्ये पुढे आला असला तरी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेनेही अधिक जागृतता बाळगणे गरजेचे आहे. पंधरा वर्षांपुर्वी शिराळा तालुक्यात खसखसची लागवड करण्यात आली होती. या प्रकरणी पुढे काय झाले हे समाजासमोर आलेच नाही. जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत गांजा लागवड केली जाते अशी वंदता आहे. तयार होणारा गांजा कर्नाटकमागे हैदराबादमध्ये नेला जातो. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये या गांजाची मागणीही जादा असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. मात्र, ही साखळीच उघडकीस येत नसल्याने या व्यवसायातील तस्करांचे फावते आहे.

शिपूर येथे करण्यात आलेल्या गांजा लागवडप्रकरणी संशयित शेतकऱ्याचे बँक पासबुक, भ्रमणध्वनी तपासणीसाठी ताब्यात घेतले असून त्यातून या व्यवहारात गुंतलेल्यांची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनीही असे प्रकार आढळले तर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला तर समाजाला लागू पाहणाऱ्या वाळवीचा वेळीच बंदोबस्त करणे शक्य होईल.

– संध्याराणी देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *