Headlines

पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र | mahrashtra granddaughter open letter to shivpratishthan sambhaji bhide controversial statement nrp 97

[ad_1]

‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे आजोबा,

“हो हो आजोबाच…! कारण कदाचित मी तुमच्या नातीच्या वयाचीच आहे. तर पत्रास कारण की, मी अगदी आताच तुमच्याबद्दलची एक बातमी वाचली. त्यात तुम्ही पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. एक महिला पत्रकार तुम्हाला तिच्या कामाचा भाग म्हणून प्रश्न विचारण्यासाठी आली होती. पण तुम्ही मात्र तिला तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो, असे म्हणत जवळपास हाकलून दिलं. त्यानंतर आता तुमच्यावर कारवाईही होणार असं म्हटलं जातंय. पण चिमूटभर कुंकू किंवा नखाएवढ्याशा त्या टिकलीमुळे तुम्ही त्या महिला पत्रकाराची अवहेलना केली हे पाहून फारच वाईट वाटलं.

कुंकू-टिकली-गंध हा कायमच वादाचा विषय असतो. का कोणास ठाऊक पण विशिष्ट धर्माचा टॅग देऊन सर्वजण त्यावर जाहीर मत व्यक्त करू लागले आहेत. कुंकू लावणे किंवा टिकली लावणे हे हिंदू धर्माचे प्रतिक आहे असं म्हटलं जातं. आम्हाला शाळेपासून कॉलेजपर्यंतही हेच सांगितलं गेलं. पण एवढ्याशा त्या टिकलीची एवढी चर्चा का? त्यावरुन एखाद्या बाईचं चारित्र्य कसं आणि का ठरवलं जातं?

भिडे आजोबा, तुमचा जन्म १९३३ मधला आणि माझा हल्लीच्या २००१ चा….मी आता जाणती आहे. अनेक गोष्टी मलाही कळतात. तुम्ही काही दिवसांपूर्वी ८९ वर्षांचे झालात आणि मी जेमतेम २१ वर्षांची….! तुम्हाला सल्ला देण्याचं निश्चितच माझं वय नाही. पण आज तुम्ही त्या महिला पत्रकाराशी कुंकू न लावल्यामुळे केलेलं वक्तव्य अजूनही मनाला पटत नाही.

आम्ही २१ व्या शतकात जगणाऱ्या मुली आहोत. आमच्या काळात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यापेक्षा जास्तच काम करते. त्या गोष्टी करताना माया, आपुलकी या गोष्टी असतात. पूर्वीच्या काळात महिलांचं क्षेत्र केवळ चूल आणि मूल या दोनच गोष्टीपुरतं मर्यादित होतं. घराबाहेर पडणं किंवा कामानिमित्त बाहेर जाणं हे सर्व तर दूर दूरपर्यंत कुठेही नव्हतं. त्यामुळे दिवसभर नऊवारी साडी नेसून राहणं, पदर डोक्यावर ठेवणं, ठसठशीत दिसेल असं कुंकू किंवा टिकली लावणं, पायात जोडवी घालणं, हातात बांगड्या अन् गळ्यात डोरलं… हे सगळं शक्य होतं.

पण आताच्या काळात हे सर्व करायला वेळच शिल्लक नसतो. सकाळी उठल्यापासून घरातल्या कामांपासून दगदगीला सुरुवात होते. आता आईचंच घ्या ना, ती बिचारी सकाळी पाचच्या ठोक्याला उठते, सर्वांच्या अंघोळ-पांघोळी, गरम पाणी देण्यापासून त्यांचा डबा देईपर्यंत सर्व कामं तिलाच करावी लागतात. त्यानंतरही कपडे धुणे, घरातली आवराआवर करणं, जेवण या गोष्टींचा पसारा आवरुन दगदग करुन तिला १० च्या ठोक्याला ऑफिसलाही जायचं असतं. तिकडे जाऊन संध्याकाळी सात पर्यंत काम करावं लागतं. यानंतर रात्री आठ-नऊला ती दमून भागून घरी येते आणि जेवणं वगैरे आवरुन दुसऱ्या दिवशीची तयारी करुन झोपी जाते.

एखाद्या दिवशी जर या गडबडीत ती टिकली लावायला विसरली तर काय फरक पडतो. टिकली न लावल्यामुळे ती हिंदू नाही, असं होत नाही. हल्ली बऱ्याचदा मी ही जिन्स परिधान करते. त्यावर टिकली लावणं मला अजिबात आवडत नाही. पण एखादी साडी नेसल्यावर किंवा छान पंजाबी ड्रेस घातल्यावर मात्र मी न चुकता अगदी आवर्जून टिकली लावते. त्यावेळी मला ती लावण्यासाठी कोणीही जबरदस्ती करत नाही. पण मला त्यावेळी टिकली लावणं आवडतं म्हणून मी ते करते. टिकली लावल्याने सौंदर्य खुलतं याची मला कल्पना आहे. पण मग टिकली न लावल्याने तुम्ही कुरुप दिसता किंवा तुमचे सौंदर्य खुंटतं हे बोलण्याचा किंवा ठरवण्याचा अधिकार तुम्हालाच काय तर इतर कोणीलाही नाही.

हल्ली पोशाखानुसार टिकली लावण्याचा ट्रेण्ड बदलत चालला आहे. टिकली लावावी की नाही, हे जिचं तिनं ठरवलं पाहिजे. राजकीय क्षेत्रात अमृता फडणवीस, अदिती तटकरे, पंकजा मुंडे यांसारख्या अनेक महिला आहेत, ज्या अनेकदा टिकली न लावता घराबाहेर पडतात. पण त्याचा त्यांच्या कामावर काहाही फरक पडत नाही. तसेच यामुळे या सर्व महिलांचे हिंदुत्व किंवा भारतीयत्व कमी होत नाही.

त्याबरोबरच कल्पना चावला, ऐश्वर्या राय बच्चन, पी. व्ही. सिंधू, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकार, मिताली राज या भारतातील कर्तृत्ववान महिला फार कमी वेळा टिकली लावताना दिसतात. पण त्यांच्या नावे जागतिक दर्जाच्या विक्रमांची नोंद आहे. त्यांनी जगाच्या पाठीवर भारताचं नाव गाजवलं आहे. या महिलांनी टिकली, बांगड्या, जोडवी या बेड्या तोडल्या आहेत. वेळेनुसार ते त्या पाळतात. पण जिथे गरज नसते तिकडे त्या याचा बाऊ करत नाहीत. जर त्यांनी ते केलं नसतं तर त्या आज कुठे असत्या? या महिलांना कधीच टिकली लावा, असे बोलण्याची हिंमत कोणी का करत नाही. त्यांनी दरारा, त्यांची प्रतिष्ठा यावरुन या गोष्टी ठरतात का?

एका पत्रकारानेही शिक्षण, अभ्यास, त्यासाठी लागणारी मेहनत केलेली असते जी गीता फोगट, पी. व्ही सिंधू किंवा इतर महिलांनी केलेली आहे. मग सर्वसामान्य महिलांना एक न्याय आणि या महिलांना वेगळा असं का बरं, आजोबा?

आजच्या काळातली स्त्रीही काळानुरुप वागते. कुंकू लावायचं की नाही हा त्या त्या बाईचा लूकआऊट आहे. तिने प्रथा, परंपरा यासाठी ते करावं, ते करु नये, हे सांगणारे आपण कोण आहोत? ती टिकली लावत नाही यावरुन ती धर्माचा अनादर करते, हे ठरवणारे आपण कोण?

एखादी साधं घरकाम करणारी महिला ते मॅनेजरच्या पोस्टपर्यंत असलेली महिला यांचा प्रत्येकीचा स्ट्रगल हा वेगळा असतो. त्या काम, अभ्यास आणि तिचं स्ट्रगल या गोष्टींमध्ये स्वत:ला सिद्ध करुन इथपर्यंत पोहोचलेल्या असतात. पण एखाद्या चिमूटभर टिकलीमुळे त्या महिला पत्रकाराला अशाप्रकारे तुम्ही रोखता, ते एक नात म्हणून पाहणं फार जास्त त्रासादायक वाटतं. हे फार दुर्देवी आहे. धार्मिकरित्या स्त्रियांना घालण्यात आलेली ही बंधन मोकळी व्हायला हवीत. ते फार गरजेचे आहे, आजोबा!”

तुमची कृपाभिषालाशी
महाराष्ट्राच्या एका घरात वाढलेली तुमचीच नात



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *