Headlines

हजेरी पत्रकावर डिसलेंच्या उपस्थितीची नोंदच नाही ; चौकशी समितीच्या अहवालात ठपका

[ad_1]

सोलापूर/ मुंबई : जागतिक पुरस्कार विजेते वादग्रस्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीतील उपस्थितीच्या नोंदी नसल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे. समितीने १२ मुद्दे समोर ठेवून डिसले यांची चौकशी केली असून  समितीने सहा निष्कर्ष अहवालात मांडले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेतून डिसले यांची बदली प्रतिनियुक्तीवर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात बदली झाली असतानाही नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत गैरहजर राहिले आणि परितेवाडी शाळेतही शालेय कामकाज केले नाही. यासह विविध १२ मुद्दय़ांची चौकशी प्रशासनाने केली आहे. या चौकशीत डिसले यांनी ४८५ पानी खुलासा सादर केला होता, परंतु समितीचे समाधान झाले नाही.

 चौकशी समितीने डिसले यांच्यावर ठपका ठेवणारे सहा निष्कर्ष काढले आहेत. डिसले यांनी वेळापूरच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर हजर व्हावे यासाठी माढय़ाच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी परितेवाडी प्राथमिक शाळेतून कार्यमुक्त केले. तसे असूनही ते ५ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत नियुक्तीसाठी हजर झाल्याचे दिसून आले.  १३ नोव्हेंबर २०१७ ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत डिसले यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत कामकाज केल्याचे दिसून आले नाही.

डिसले यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत एक दिवसही उपस्थित राहून ठरलेले कामकाज केले नाही. तेथील हजेरी पत्रकावरही त्यांची एकही स्वाक्षरी नाही. तसेच कोणतेही अभिलेखी पुरावे विहित नमुन्यात नाहीत. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे मासिक दैनंदिनी उपलब्ध नाही.

डिसले यांच्या प्रतिनियुक्ती कालावधीची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली.  ते १ मे २०२० रोजी त्यांच्या मूळ नियुक्तीच्या परितेवाडी शाळेत हजर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात डिसले हे ६ ऑक्टोबर २०२० रोजी शाळेत हजर झाले. यावरून १३ नोव्हेंबर २०१७ ते ४ फेब्रुवारी २०१८ आणि १ मे २०२० ते ५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत डिसले यांनी कोठे काम केले, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चौकशी कालावधीत परितेवाडी जिल्हा परिषद शाळा, वेळापूरची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेकडील शालेय अभिलेखे पाहता डिसले यांनी वेगवेगळय़ा प्रकारची स्वाक्षरी केल्याचे दिसून येते. परितेवाडी जि. प. शाळा, सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूरचे सिंहगड इन्स्टिटय़ूट आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यापैकी कोणत्याही ठिकाणी १३ नोव्हेंबर २०१७ ते ५ मे २०२० या कालावधीतील ‘एन्ट्री मस्टर’, उपस्थिती पत्रक, शेरे बुक इत्यादीपैकी एकही अधिकृत नोंद उपलब्ध झाली नाही. तसेच डिसले हे या कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करू शकले नाहीत.

विज्ञान केंद्रातही गैरहजर..

सोलापूर विज्ञान केंद्रात डिसले यांनी कामकाज केल्याचे त्यांनी खुलाशात नमूद केले आहे. प्रत्यक्षात सोलापूर विज्ञान केंद्रातून माहिती घेतली असता त्यांनी सोलापूर विज्ञान केंद्रात कामकाज केल्याचे कोणत्याही कागदपत्रावरून दिसून येत नाही. जिल्हा परिषद आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्यात झालेल्या करारानुसार डिजिटल शिक्षण उपक्रम केवळ जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी होता. परंतु डिसले यांनी जि. प. शाळा विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त बाहेरील देशांतील विद्यार्थ्यांना उपक्रमाचा लाभ देऊन नियमांचा भंग केला. याबाबत डिसले यांनी वरिष्ठांकडून कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *