Headlines

हा देश तरुणांच्या हौतात्म्यवर, एकतेवर बनला आहे – रमेश बागवे

पुणे/विशेष प्रतिनिधी – खरे साधू-संत जोडायचे काम करतात, तोडायचे नाही. संविधान, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. धर्माचं राजकारण कितीही केलं तरी हा देश तरुणांच्या हौतात्म्यवर, एकीवर बनला आहे असे परखड मत भारतीय काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी मांडले . हरिद्वार येथील धर्म संसदेत अल्पसंख्यकांविरुद्ध करण्यात आलेल्या हिंसक व द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या विरोधात निदर्शने  जंगली महाराज रोड येथे करण्यात आली.

 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, लोकायत व राष्ट्रीय एकात्मता समिती यांनी भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि बंधूता ही मूल्ये प्रस्थापित करणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम  शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता .

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की ज्यांनी संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश दिला त्या येशू ख्रिस्ताच्या जन्म दिनाच्या पूर्वसंध्येला बंधुता वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन निषेधाची सभा घ्यावी लागते ही शोकांतिका आहे.

धर्माच्या नावाखाली नागरिकांना गुंतवून आज देशाची आर्थिक परिस्थिती ढासळवली आहे. आज शेतकरी, बँक कर्मचारी, कष्टकरी वर्ग रस्त्यावर आला आहे. आपल्याला घरोघरी जाऊन संविधानाची मूल्ये रुजवावी लागतील अशा भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केल्या.

धर्मनिरपेक्षता जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, हिंदू-मुस्लिम-सिख-ईसाई हम सब बहनें, हम सब भाई अशा घोषणा ही कार्यक्रमात देण्यात आल्या.

यावेळी नॅशनल स्टुडन्ट्स युनियन ऑफ इंडिया, नॅशनल युथ काँग्रेस, राष्ट्रीय एकात्मता समिती, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती,  सर्व पुरोगामी संघटनाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप हम होंगे कामयाब या गाण्याने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निश्चय म्हात्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *