Headlines

cm health care relief fund supports lakhs of patients in maharashtra

[ad_1]

संदीप आचार्य

‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता निधी’च्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षावधी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून गरीब रुग्णासाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात खुली करून दिली आहे. महत्वाचे म्हणजे पूर्वी ज्या खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश नव्हता त्या आजारांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यात जवळपास १२०० हून अधिक रुग्णांना या योजनेमधून पाच कोटी रुपये मदत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तात्काळ जुलै महिन्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत निधी योजने’ला गती देण्याचे आदेश जारी केले. तसेच या योजनेचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली. चिवटे यांनी योजनेविषयी सांगितले की, यापूर्वी अनेक खर्चिक व गंभीर आजारांचा या योजनेत समावेश नव्हता, तो आता नव्याने करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी जो अर्ज करावा लागतो त्यात सोपेपणा आणण्यात आला आहे. शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाख रुपयांची तर ऑगस्टमध्ये २६३ रुग्णांना सव्वा कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये २९२ रुग्णांना एक कोटी ५६ लाख रुपये मदत करण्यात आली.

ऑक्टोबरअखेरीस साधारणपणे १२०० रुग्णांना पाच कोटी रुपयांपर्यंत मदत दिली जाईल, असे चिवटे यांनी सांगितले. या योजनेला आगामी काळात अधिक गती देण्यात येणार असून जास्तीतजास्त रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत निधीचा लाभ मिळेल याची काळजी घेतली जाईल. आज या निधीत १४४ कोटी रुपयांची गंगाजळी असून आगामी काळात ती मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा संकल्प आहे.

फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे २०१४ ते मार्च २०१९ या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून लक्षावधी रुग्णांना मदत करण्यात आली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मदत करण्यात आली होती. परिणामी पाच वर्षांत २० लाख ८३ हजार रुग्णांना आर्थिक मदत मिळू शकली. यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’च्या माध्यमातून ५७५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली तर ४३० धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास १२०० कोटी रुपयांची मदत केल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे तत्कालीन प्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांनी सांगितले.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा या गरीब रुग्णांना मोफत उपचारासाठी तर दहा टक्के खाटा या दुर्बल घटकातील लोकांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचारासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालयात किती गरीब रुग्णांना उपचार केले जातात याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षच्या माध्यमातून याचे नियोजन व नियंत्रण करण्यास सुरुवात केली. यासाठी या कक्षेत स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात आला. यामुळे कोणत्या धर्मादाय रुग्णालयात किती खाटा या योजनेत उपलब्ध आहे व किती लोकांना मदत मिळते याची रोजची माहिती उपलब्ध होऊ लागली. परिणामी राज्यातील ४३० धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून लाखो गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना फडणवीस यांनी वैद्यकीय मदत मिळवून दिली होती. यात कॉक्लिअर इंप्लांट व लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया प्राधान्याने करण्यात आल्या होत्या.

फडणवीस मुख्यमंत्री बनण्यापूर्वी म्हणजे २००९ ते २०१४ या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून केवळ ९,७०३ रुग्णांना ९८ कोटी ६९ लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या काळात प्रामुख्याने करोनाचा सामना करावा लागला. यातही बराच मोठा काळ हा टाळेबंदीत गेला. उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत प्रामुख्याने येणारी सर्व मदत ही करोनावरील उपचारासाठी वळविण्यात आली. या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता निधीच्या माध्यमातून देण्यात येणारी मदत २५ हजार रुपये इतकी मर्यादित करण्यात आली होती. मात्र गरज तपासून अनेक रुग्णांना लाखापर्यंत मदत देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात ह्रदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये मदत मिळेल.

या शिवायच्या अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. वरील निकषात कोणते रुग्ण बसू शकतात व त्यांना नेमकी किती मदत दिली जावी हे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली असून ती याबाबत निर्णय घेईल असे चिवटे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, राज्यातील प्रत्येक गोरगरीब रुग्णांला चांगले उपचार मिळावे हा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात या योजनेला गती दिली जाईल. तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा बळकट व सक्षम करून तेथेही गरजू व गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी लक्ष दिले जाईल. यासाठी आरोग्य विभागाला दुप्पट निधी देण्याची माझी भूमिका आहे. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीतजास्त रुग्णांना वेळेत व चांगले उपचार मिळावे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *