Headlines

बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान, रस्त्याची अट ; कराडजवळील गावकारभाऱ्यांचा प्रताप

[ad_1]

कराड : मद्याचा आणि मद्यपींचा अतिरेक होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या जादा अधिकारांचा गैरवापर कसा करावा, याचे उत्तम उदाहरण विरवडे (ता. कराड) ग्रामपंचायतीने घालून दिले आहे. बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान व या जागेतून २० फुटांचा रस्ता करून देण्याच्या अटींवर आणि त्याची रीतसर ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेण्याचा प्रताप विरवडेच्या गाव कारभाऱ्यांनी केला आहे.

प्रस्तावित बियरबारची जागा हजारमाची (ओगलेवाडी)  ग्रामपंचायत क्षेत्रात असताना, त्याबाबतचा ठराव विरवडे ग्रामपंचायतीने केल्याची बाबही समोर आल्याने हा वादाचाही विषय ठरला आहे. हा ठराव ४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या विरवडे गावच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यावर ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशातच प्रस्तावित मद्यविक्री केंद्राची जागा एका खासगी कंपनीच्या मालकीची असून, ही मिळकत प्रॉव्हिडंट फंड विभागाने जप्त केली आहे. असे असताना या जागेत बियरबारचा घाट कसा घातला जातोय? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. या बियरबारचे अर्जदार हे अन्य जिल्ह्यातील असल्याचीही माहिती असून, या सर्व प्रकरणात आर्थिक तडजोडीचा आरोप होऊ लागला आहे. या बियरबारची जागा हजारमाची (ओगलेवाडी) हद्दीत आणि त्याच्या परवानगीसाठीचा ठराव विरवडे ग्रामपंचायतीचा आणि तोही बेकायदेशीर झाल्याने दोन गावांतील हद्दींबरोबरच या एकूणच प्रकरणाबाबत वादाची शक्यता आहे. या प्रकरणी हजारमाची (ओगलेवाडी) गावचे माजी पोलीस पाटील मुकुंद कदम यांनी आवाज उठवला आहे. याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना मुकुंद कदम म्हणाले, या प्रकरणी आपण महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध करून घेत असून, हा लाचेचा गुन्हा असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहोत. काही कागदपत्रे देण्यास टाळले जात आहे. यावर आपण गटविकास अधिकाऱ्याकडेही तक्रार केली असल्याचे कदम यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *