Headlines

विश्लेषण : सोयाबीनला यंदा किती भाव मिळणार? शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण का? | Soybean market price in Maharashtra what rate will farmers get print exp scsg 91

[ad_1]

-मोहन अटाळकर

महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला यंदा अतिपावसाचा फटका बसलेला असताना, बाजारात सोयाबीनचे भाव घसरणीला लागल्याने राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक भागात सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू आहे. सोयाबीनचे भाव साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. गेल्या ३० ऑगस्टला ते ७ हजार २०० रुपये इतके होते. गेल्या वर्षी याच काळात सोयाबीनला सरासरी ८ हजार २६४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर सध्याचे भाव तरी टिकून राहतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोयाबीनचे भाव कोणत्या घटकांवर अवलंबून आहेत?

विविध देशांमधील सोयाबीनचे उत्पादन, चीनसारख्या मोठ्या खरेदीदार देशातर्फे होणारी या सोयाबीनची आयात‍, सोयाबीनची उत्पादकता, सोयाबीन पेंडीची (डीओसी) मागणी अशा अनेक घटकांवर सोयाबीनचे भाव ठरत असतात. सध्या अमेरिकेत सोयाबीनच्या काढणीने वेग घेतला आहे. पण, या देशात काही ठिकाणी कोरडा दुष्काळ तर काही भागात अतिपावसाचा पिकांना फटका बसला, त्यामुळे सोयाबीन प्रक्रिया उद्योग सध्या उत्पादकता किती येईल, याचा अंदाज घेत आहेत. बाजारात सोयाबीन भावात काहीशी चढ-उतार सुरू आहे. चीन‍ आणि इतर देशांची मागणी वाढल्यास सोयाबीनला आधार मिळेल. त्यामुळे सोयाबीनच्या भावात आणखी घसरण होणार नाही, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सोयाबीनची महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ४६.०१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. यंदा त्यात तब्बल २ लाख हेक्टरनी वाढ झाली आहे. यंदा राज्यात सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्र ४८.७६ लाख हेक्टर एवढे आहे. राज्यातील कृषी सांख्यिकी विभागाच्या अहवालानुसार २०२०-२१ या वर्षात ६२.६४ लाख मे.टन तर २०२१-२२ च्या हंगामात ५४.२२ लाख मे.टन सोयाबीनचे उत्पादन झाले. देशात सोयाबीनची सरासरी उत्पादकता ही ९२८ किलोग्रॅम प्रतिहेक्टर इतकी असताना महाराष्ट्रात मात्र ती सरासरी ८६० कि.ग्रॅ. प्रतिहेक्टर आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन लागवडीचे प्रमाण लक्षणीय आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादकता खूप अधिक आहे, मात्र त्याच भागातील अन्य शेतकऱ्यांची उत्पादकता कमी असल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय, अतिपाऊस, रोगराई यामुळेही उत्पादकता ही कमी होते.

यंदा सोयाबीन उत्पादनावर परिणाम करणारे घटक कोणते?

सध्या बाजारात सोयाबीन पिकांची स्थिती आणि उत्पादनाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. प्रक्रिया उद्योगांच्या मते पिकांची स्थिती चांगली आहे, तर दुसरीकडे, अतिपावसामुळे यंदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतीतज्‍ज्ञांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार आणि सतत पाऊस झाले. तसेच खोड कीड आणि येलो मोझॅक रोगाचाही प्रादुर्भाव दिसून आला. देशात आवकेचा हंगाम संपल्यानंतर सोयाबीनचे भाव वधारतात. मात्र सरत्या हंगामात आवक संपल्यानंतर बाजार दबावात आला. सोयाबीनचे भाव सरासरी ७ हजार रुपयांवरून ५ हजार रुपयांपर्यंत आले आहेत. त्यातच यंदा उत्पादन वाढीच्या बातम्या पसरल्याने बाजारात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस होत आहे, त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता असते. जाणकारांच्या मते पुढील महिनाभर सोयाबीनला किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो.

शेतीतज्‍ज्ञांचा अंदाज काय आहे?

देशात तेलाची होणारी आयात आणि सोयापेंडीच्या विक्रीच्या दरावरून सोयाबीनचा भाव ठरणार आहे. सध्या देशातून ५५० डॉलर प्रतिटन या दराने सोयापेंडीची निर्यात करता येते. त्यामुळे सोयाबीनला ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो असे तज्‍ज्ञांचे मत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये सोयाबीनला सरासरी ८ हजार २६४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे निरीक्षण ‘द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने नोंदविले आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या भावामध्ये तब्बल ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

मंदीतून बाहेर येण्यासाठी काय करावे लागेल?

मंदीच्या सावटातून बाहेर येण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज शेतीतज्‍ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोयापेंडीची निर्यात वाढलेली नाही. उलट सोयातेलाची आयात सुमारे ५० टक्के वाढली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनसह अशुद्ध पाम आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. आताच्या स्थितीत खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. ते आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत आयात शुल्कात वाढ करण्याची गरज असल्याचे मत शेतीतज्‍ज्ञांनी व्यक्त केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *