Headlines

उमेश कोल्हे हत्याकांड : अमरावतीतील मुस्लीम वस्ती भीतीच्या सावटाखाली

[ad_1]

अमरावती : उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी ‘एनआयए’चे छापेसत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिमेकडील मुस्लीमबहुल परिसर भीतीच्या सावटाखाली आहे. अनेक लोकांनी व्हॉट्सअ‍ॅप पाहणे बंद केले आहे. समाज माध्यमांवरील समूहांमधून लोक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडत आहेत. 

हत्या प्रकरणातील सूत्रधार शेख इरफानच्या ‘रहबर हेल्पलाईन’ या संस्थेने करोना संकटाच्या काळात चांगली कामे केली. तब्बल १४० हिंदू मृतांवर त्याच्या संस्थेने रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केल्याचे परिसरातील लोक सांगतात. या संस्थेसोबत अनेक लोक जुळले. त्यांची इरफानसोबत छायाचित्रे देखील आहेत. आता पोलीस आपल्यालाही पकडून नेतील, ही भीती या लोकांना आहे. या प्रकरणातील आरोपी हे तरुण आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील नाही. पण, या कट्टरवादाकडे ते कसे काय झुकले, याचे आश्चर्य लोक व्यक्त करतात. काही कट्टरवादी लोकांमुळे संपूर्ण समाजाची बदनामी होते. असे व्हायला नको, ही या परिसरातील रहिवाशांची भावना आहे.

कोल्हे यांच्या हत्येनंतर त्यांचा व्यावसायिक मित्र पशुवैद्यक युसूफ खान (४४) याच्या कुटुंबालाही जबर मानसिक धक्का बसला आहे. कोल्हे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेली नुपूर शर्माच्या समर्थनाची प्रतिक्रिया युसूफने दुसऱ्या समूहात पाठवली, हाच त्याचा दोष. पण, त्याची एवढी मोठी किंमत त्याला चुकवावी लागेल, हे स्वप्नातही वाटले नसेल, असे युसूफ यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.  युसूफची पत्नी शबनम सेहर (४०) देखील उच्चशिक्षित आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होईल आणि न्याय निश्चितपणे मिळेल, असा विश्वास शबनम यांनी व्यक्त केला आहे.

या हत्या प्रकरणाशी डॉ. युसूफचा काहीही संबंध नाही. प्रतिक्रिया दुसऱ्या समूहामध्ये पाठवली आणि दुसऱ्या दिवशी हत्या झाली. कावळा बसणे आणि फांदी तुटणे, अशीच ही स्थिती होती, असा युसूफच्या कुटुंबीयांचा दावा आहे.

डॉ. युसूफची कामावर निष्ठा होती. जनावरांच्या उपचारासाठी कुणाचाही फोन आला तर तो धावून जायचा. बारा-तेरा तास काम करायचा. त्याचे अनेक हिंदू मित्र आहेत. तेही त्याच्या बाजूने उभे आहेत, असा युसूफच्या कुटुंबीयांचा दावा आहे. ‘एनआयए’च्या पथकाने चौकशीदरम्यान डॉ. युसूफच्या कुटुंबीयांना चांगली वागणूक दिली आणि आम्हीही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याचे युसूफच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

युसूफ दोन दिवस उपाशी..

उमेश कोल्हे आणि युसूफ यांची १६ वर्षांची मैत्री होती. मित्राच्या मूत्यूने युसूफ कोलमडून गेला होता. अनेकवेळा रडला. दोन दिवस तो उपाशी होता. तो कोल्हेंच्या अंत्ययात्रेलाही गेला होता. तो कसा काय हत्येच्या कटात सहभागी असू शकेल, असा सवाल  युसूफची पत्नी शबनम यांनी केला आहे. आमचा न्यायावर विश्वास आहे. युसूफचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *