Headlines

Uddhav Thackeray Rathods Shiv Sena politics power shinde group ysh 95

[ad_1]

नितीन पखाले

यवतमाळ : शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटासोबत गेलेले व मंत्री झालेले संजय राठोड यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच शह देण्याची व्यूहरचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. त्यासाठीच ते स्वत: बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) येथे भेट देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राठोड यांनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर बंजारा समाजाची ताकद पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेना-भाजप युतीत तणाव निर्माण झाला होता. अशा वातावरणात संजय राठोड यांनी पोहरादेवी (ता. मानोरा) येथे नगारा वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजनासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना डिसेंबर २०१८ रोजी एका मंचावर आणले होते. त्या वेळी कार्यक्रमाला उपस्थित लाखोंच्या संख्येतील बंजारा समाज पाहून या दोन्ही नेत्यांना बंजारा समाजाच्या ताकदीचा प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने संजय राठोड यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद सोपविले. दरम्यानच्या काळात एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी पोहरादेवी येथे भेट देऊन शक्तिप्रदर्शन केले. करोना संसर्गाच्या काळात गर्दी जमवल्याने शिवसेनेवर चौफेर टीका झाली होती. त्या वेळी तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.

पुणे पोलिसांनी तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात केलेल्या चौकशीत राठोड यांना ‘क्लीनचीट’ दिल्याचा दावा करत राठोड यांना पुन्हा मंत्री करावे, यासाठी पोहरादेवीतील महंत, बंजारा समाजातील विविध संस्था, संघटनांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र भाजपने या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेतल्याने राठोड पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत. दरम्यान, राज्यात घडलेल्या ताज्या राजकीय घडामोडीत संजय राठोड दोन दिवस उद्धव ठाकरेंसोबत राहून नंतर शिंदे गटात सहभागी झाले. तेव्हा ‘संजय राठोड यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली याची खंत वाटते,’ अशी जाहीर टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना थेट त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी पोहरादेवी येथून शिवसेनेच्या विदर्भातील संपर्क मोहिमेचा शुभारंभ करण्याचे ठरविल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या या भेटीसाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक व मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. राजू नाईक यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे भेट देऊन धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले व पोहरादेवी भेटीचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे हे लवकरच पोहरादेवी येथे भेट देऊन विदर्भात शिवसेना प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे या वेळी राजू नाईक यांनी स्पष्ट केले. या भेटीवरून बंजारा समाजात दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे, कारण नव्या सरकारमध्ये मंत्री होताच संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवी येथे नुकतीच १४ ऑगस्टला बंजारा धर्म परिषद घेण्यात येऊन पुन्हा शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्या वेळी बंजारा समाजाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बेदखल करता येणार नाही आणि बंजारा समाजातील नेतृत्वावर कोणीही कसलेही आरोप केले तर खपवून घेतले जाणार नाही, असा गर्भित इशारा देण्यात आला.

पोहरादेवी हे देशातील १२ कोटी बंजारा समाजाचे धर्मपीठ आहे. येथे घेतला जाणारा निर्णय बंजारा समाजासाठी प्रमाण मानला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर पोहरादेवी येथे एकछत्री वर्चस्व निर्माण करण्यात मंत्री संजय राठोड यांना यश आले. शिवाय समाजासाठी आपण काहीतरी करत आहो, हे त्यांनी नगारा वस्तुसंग्रहालयाची पोहरादेवी येथे निर्मिती करून व त्यासाठी तब्बल १२५ कोटींचा निधी शासनाकडून खेचून आणत दाखवून दिले. याशिवाय देशभर दौरे करून आपण बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेतृत्वही करू शकतो, असा संदेश महाराष्ट्रातील राजकारणात दिला. पोहरादेवी येथे नुकत्याच झालेल्या धर्मपरिषदेतही राज्यात संजय राठोड यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पोहरादेवी भेटीस बंजारा बांधव किती, कसा प्रतिसाद देतात, यावरच शिवसेनेची बंजारा समाजाला आपलेसे करण्याची खेळी अवलंबून आहे.

फरक पडणार नाही!

संजय राठोड यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याचा निर्णय बंजारा समाजाने धर्मपरिषदेत घेतला आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक राजू नाईक हे कायम बंजारा समाजातील प्रत्येक नेतृत्वाविरोधात असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याचा स्वत:च्या राजकीय पुनर्वसनासाठी राजू नाईक वापर करीत असल्याची टीका राठोड यांचे कट्टर समर्थक हरिहर लिंगनवार यांनी केली आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याने कोणताही फरक पडणार नसल्याचे लिंगनवार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *