Headlines

संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

[ad_1]

माउलींच्या सोहळय़ाचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

मंदार लोहोकरे, लोकसत्ता

पंढरपूर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण पार पडले. त्यानंतर सायंकाळी माउली आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू सोपानदेव यांची बंधुभेट झाली. तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळय़ात तोंडले बोंडले येथे धावा झाला. संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश झाला. त्यामुळे ‘भेटी लागे जीवा लागलीस आस’ या अभंगाप्रमाणे पायी वारीतील भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.  माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान ठेवून पुढे ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पोचली. या ठिकाणी माउलीचे रिंगण पाहण्यासाठी भाविक जमा होऊ लागले होते. काही वेळातच माउलीची पालखी, त्या पाठोपाठ अश्व आले.

चोपदाराने रिंगण लावले आणि अश्वाने तीन फेरी पूर्ण केली. माउली-माउली , टाळ मृदंगांचा जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला. पुढे पालखी तोंडले येथे दुपारचे भोजनासाठी विसावली. येथे दिंडय़ांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळा, माडग, भाकरी, भात, लोणचे, अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदी भागातील गावकरी घेऊन आले होते. वारकऱ्यांनी या शिदोरीचा आस्वाद घेतला. पुढे पालखी टप्पा येथे मार्गस्थ झाली. काही वेळातच माउलींचे ज्येष्ठ बंधू सोपानदेव यांची पालखी आली. या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोचली.

 जगद्गुरू तुकाराम महारज यांच्या पालखीने बोरगाव येथून प्रस्थान ठेवले. पुढे पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. ‘तुका म्हणे धावा .. आहे पंढरीस विसावा’ या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. त्यानंतर पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचली. सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे. पंढरपूरच्या जवळ आल्याने भाविकांना आता आस लागली ती पांडुरंगाच्या दर्शनाची.

आज पालखी कुठे ?

माउलीची पालखी शुक्रवारी भंडीशेगाव येथून मार्गस्थ होऊन बाजीराव विहीर येथे चौथे गोल रिंगण व उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावेल. तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी पिराची कुरोली येथून मार्गस्थ होईल. या सोहळय़ाचे बाजीराव विहीर येथे उभे रिंगण होऊन पालखी वाखरी मुक्कामी दाखल होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू सोपानदेव यांच्या पालख्यांचा गुरुवारी बंधुभेट सोहळा पार पडला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *