Headlines

सांगलीत शिवसेनेची ताकद आधीच कमी त्यात पक्ष दुंभगलेला

[ad_1]

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : राज्यातील सत्तांतरानंतर जिल्हा शिवसेनेतही दोन गट पडले असून एका जिल्हाध्यक्षांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून एका जिल्हा प्रमुखाने ठाकरे यांच्याच गटात कार्यरत राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे या फुटीचे पडसाद आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रकर्षांने दिसतील. जिल्ह्यात मुळातच शिवसेनेची ताकद कमीच होती, तरीही महाविकास आघाडीची सत्ता असताना वाढीला संधी असतानाही विस्तारली नाही. खानापूर-आटपाडीचा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी आमदार अनिल बाबरच शिंदे गटात सहभागी झाल्याने अख्खा मतदारसंघच शिंदे गटात विलीन झाल्यात जमा आहे.

शिवसेनेने जिल्ह्याला दोन जिल्हाप्रमुख दिले होते. यामध्ये इस्लामपूरचे आनंदराव पवार आणि विटय़ाचे संजय विभुते. यापैकी पवार यांनी प्रारंभीच्या काळात ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी इस्लामपूरात पदयात्रा काढून शिंदे यांच्या बंडखोरीला विरोध केला होता. मात्र शिवसेनेतील बंडखोरीला आमदारांमधून मिळणारे पाठबळ पाहताच त्यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. 

इस्लामपूर नगरपालिकेत शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. गत निवडणुकीत स्थापन झालेल्या विकास आघाडीच्या माध्यमातून हे नगरसेवक निवडून आले असल्याने स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष होता. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकास कामासाठी ११ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र पालकमंत्री पाटील यांनी हा निधी अडविल्याचा आरोप पवारांनी केला होता. त्यामुळे हा स्थानिक संघर्षच त्यांना शिंदे गटात सहभागी होण्यास कारणीभूत ठरला.

दुसरे जिल्हाप्रमुख विभुते यांनी पलूस कडेगावची विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी मातोश्रीशी आपल्या निष्ठा कायम राहतील, याची ग्वाही देत असतानाच जिल्ह्यातून २५ हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे जाहीर केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मिरजेत मेळाव्याचे आयोजन करून सेनेची ताकद दाखवून देण्याचा संकल्पही जाहीर केला आहे. 

भाजपशी युती असताना शिवसेनेने  जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव आणि इस्लामपूर या विधानसभेच्या जागा लढविल्या होत्या. यापैकी वाळव्यातून निवडणूक लढविणारे गौरव नायकवडी सध्या कोणत्या पक्षात आहेत हे अज्ञात असले तरी त्यांची ऊठबस भाजपच्या व्यासपीठावरच जास्त आहे. तर कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे यांनी शिवसेना विस्तारापेक्षा स्वत:चे राजकीय भवितव्य महत्त्वाचे मानले. यातून ते जिल्हा बँकेचे संचालक झाले. त्यानंतर सेनेच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात फारसे रमले नसले तरी त्यांच्या गटाचे जिल्हा परिषदेमध्ये दोन सदस्य होते.  बाबर यांच्या गटाचे तीन जिल्हा परिषदेचे सदस्य होते. उपाध्यक्षपद आमदारपुत्र सुहास बाबर यांच्याकडे होते. महाविकास आघाडीची सत्ता आली तरी शिवसेना जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्तेत होती. बदलत्या काळात शिंदे गट भाजपबरोबर जाणार हे स्पष्ट आहे, तर ठाकरे यांना मानणारे सेना कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहणार हेही खरे आहे. यामुळे येत्या जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीमध्ये कोणाची ताकद किती हे स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा एकमेव कार्यक्रम राष्ट्रवादीने गेल्या अडीच वर्षांत राबवला. जिल्ह्याचे पालकत्व असतानाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अडवणुकीचे धोरण अवलंबले. हा अन्याय असह्य होता. आमची बंडखोरी ही राष्ट्रवादीच्या वर्चस्ववादाच्या विरोधात आहे.

आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष शिंदे गट.

पक्षातून काही मंडळी बाहेर पडली असली तरी सामान्य शिवसैनिकांची मातोश्रीवरील निष्ठा कायम आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत नव्या उमेदीने शिवसेना कार्यरत राहणार असून तरुण पिढी आजही आमच्या सोबत आहे.

संजय विभुते, शिवसेना जिल्हाप्रमुख

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *