Headlines

तळीये गावाचे पुनर्वसन रेंगाळले ; दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही दरडग्रस्तांचा परिस्थितीशी संघर्ष

[ad_1]

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : तळीये येथील दरड दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र या काळरात्रीच्या आठवणी आजही गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. निसर्गाच्या प्रकोपातून सावरण्यात यश आले असले तरी आजही दरडग्रस्त कुटुंबांतील लोकांच्या मनात या आघाताच्या जखमा घर करून आहेत. गावाचे पुनर्वसन रखडले आहे. त्यामुळे ऊन, वारा आणि पावसाचा मारा सहन करत ग्रामस्थांचा परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे.

२२ जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. तळीयेतील कोंडाळकर वाडीतील ४० घरे या दरडीखाली गाढली गेली होती. या दुर्घटनेत ८४ जणांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात घर करून आहेत. दुर्घटनेनंतर गावाचे सुरक्षितस्थळी पुनवर्सन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आपदग्रस्त गावकऱ्यांनी म्हाडामार्फत अत्याधुनिक घरे बांधून दिली जातील असेही जाहीर केले होते. मात्र पावसाळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला तरी गावांच्या पुनर्वसनाला गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे आपदग्रस्त कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यात राहण्याची वेळी आली आहे

गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी गावाजवळील खाजगी जागा संपादित करण्यात आली. ही जागा पुनर्वसनासाठी सुरक्षित असल्याचा अहवालही भूवैज्ञानिकांनी दिला आहे. त्यामुळे आता या जागेवर २७१ कुटुंबांना घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यासाठी गावकऱ्यांनी केलेली वाढीव क्षेत्राची घरे मिळावीत ही मागणीही मंजूर केली आहे. मात्र या घरांच्या बांधकामाला गती मिळू शकलेली नाही.

तळीये गावात तसेच कोंडाळकरवाडी व बौध्दवाडीमध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युतपुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करणे या कामांकरिता ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही ८ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला. पण ही कामेही पूर्ण झालेली नाहीत.

ग्रामस्थांचे हाल

‘‘ज्या डोंगराच्या आंगाखांद्यावर आम्ही खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो, वास्तव्य केले तो डोंगरच आमच्या जिवावर उठेल यांची कल्पनाच नव्हती. २२ जुलै २०२१ चा दिवस आमच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस होता. त्या दिवसाची आठवण झाली तरी दचकायला आणि घाबरायला होते. केवळ दैव बलवत्तर होते म्हणूनच आम्ही वाचलो..’’ तळीयेमधील दरडग्रस्त कुटुंबीयांची ही व्यथा आहे. आज या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण बेघर झालेल्या लोकांचे हाल आजही सुरूच आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

त्या दिवसाची आठवण झाली तरी दचकायला आणि घाबरायला होते. केवळ दैव बलवत्तर होते म्हणूनच आम्ही वाचलो. पण जिवाभावाची माणसं कायमची गमावली आहेत.

पूजा बाळकृष्ण कोंढाळकर, ग्रामस्थ

कंटेनरला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पावसाळय़ात शॉर्ट सर्कीटसारखे प्रकार होत आहेत. जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. शाळेलाही गळती लागली आहे. पाणी, शौचालयांसारख्या सुविधांचा आभाव आहे. शासनाने पुनर्वसनाच्या कामाला गती द्यायला हवी.

अजय साळुंखे, ग्रामस्थ

दुर्घटनेनंतर तात्काळ पुनर्वसन हाती घेण्यात आले. मात्र घरांसाठी जमीन शोधणे, तसेच ती विकत घेऊन म्हाडाला हस्तांतरित करणे यात बराच वेळ गेला. ही प्रक्रिया मुळात मोठी होती. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला विलंब झाला. पण आता लवकरात लवकर घरांचे बांधकाम पूर्ण करून संबंधितांना घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न आहे. – भरत गोगावले, आमदार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *