Headlines

पिंपरीत पक्षांतराचा खेळ जुनाच; राज्यातील सत्तांतरानंतर पक्षबदलूंचा ओढा भाजपाकडे

[ad_1]

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात ‘आयाराम-गयाराम’चा खेळ वर्षानुवर्षे खेळला जात असल्याने पक्षांतराची परंपराही जुनीच आहे. अलीकडे राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आणि भाजपामधून राष्ट्रवादीत, अशाच कोलांटउड्या होताना दिसतात. भाजपाला उतरती कळा लागल्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर पक्षबदलूंचा ओढा भाजपाकडे दिसू लागला आहे.

पिंपरी-चिंचवड म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला, असे समीकरण अनेक वर्षे होते. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली. काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत गेला. नोव्हेंबर २००३ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण मोरे यांचे निधन झाल्यानंतर उरलीसुरली काँग्रेसही अजित पवारांना शरण गेली. त्यानंतर, काँग्रेसचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला आहे.

२०१४ च्या मोदी लाटेचा फायदा पिंपरी भाजपालाही झाला. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांसह भाजपामध्ये आले. चिंचवड विधानसभेतून भाजपातर्फे ते मोठ्या फरकाने निवडून आले. त्याचवेळी, मोदी लाट असतानाही भोसरीतून महेश लांडगे अपक्ष निवडून आले. पालिका निवडणुकीच्या तोंडावर लांडगे समर्थकांसह भाजपामध्ये दाखल झाले. जगताप व लांडगे यांच्यामुळे शहर भाजपाची ताकद कित्येक पटीने वाढली. २०१७ च्या पालिका निवडणुकीत आमदार जगताप व लांडगे यांनी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धूळ चारून पिंपरी पालिका खेचून भाजपाकडे आणली. या निवडणुकीतील भाजपाचे बहुतांश उमेदवार व निवडून आलेले नगरसेवक मूळचे राष्ट्रवादीचे होते. भाजपाने तीन जागांवरून ७७ जागांवर झेप घेतली. पिंपरी पालिका भाजपाकडे आल्यानंतर अनेक नवशे, गवशेही भाजपामध्ये आले.

राज्यातील सत्तांतराने अनेक समीकरणे बदलली –

२०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्याचा परिणाम म्हणजे पूर्वी पक्ष सोडून गेलेल्या अनेकांनी घरवापसी सुरू केली. राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर करत राष्ट्रवादीने आगामी पालिका निवडणुकांसाठी व्यूहरचना केली. पालिकेतील राजेश पाटील यांच्या प्रशासकीय राजवटीचा पुरेपूर फायदा करून घेत राष्ट्रवादीने अनेक फायदेशीर निर्णय करून घेतले. परिणामी, राष्ट्रवादीला खूपच पोषक वातावरण दिसून येत होते. मात्र, राज्यातील सत्तांतराने अनेक समीकरणे बदलली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने पालिका प्रशासनावर तसेच शहरावर असलेला राष्ट्रवादीचा पगडा कमी होऊ लागला. भाजपाने पुन्हा आपला प्रभाव निर्माण करण्याची आखणी सुरू केली. निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने पक्षांतराच्या उड्या पडतील, असे तूर्त दिसते.

निवडणुकीपूर्वी चित्र स्पष्ट होईल –

काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता भाजपाच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक वरिष्ठ पातळीवर भाजपा नेत्यांशी संपर्कात आहेत. योग्य वेळी पक्षप्रवेशाचा निर्णय घेऊ, असा त्यांचा सावध पवित्रा आहे. मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *