Headlines

पावसाच्या विश्रांतीमुळे भात लावणीच्या कामांना वेग

[ad_1]

अलिबाग – पावसाने उसंत घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. खरीप हंगामात जिल्ह्यात साधारण लाखभर हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. दक्षिण रायगडात भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर उत्तर रायगडात आता ही कामे वेगाने सुरू आहेत. लावणीची कामे सुरू असताना अंबोण्यांचे सूर शेतांमध्ये ऐकू येऊ लागले आहेत. 

मागील काही दिवसांपासून जिल्हयात पावसाची संततधार सुरू होती. १० ते १२ दिवस सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतात मोठया प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे रोपांची पुरेशी वाढ होऊनही भात लावणीची कामे थांबवावी लागली होती. त्यामुळे बळीराजा पाऊस थांबण्याची वाट पाहात होता.  मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. १२ दिवसांनी रायगडकरांना सूर्यदर्शनही झाले. शेतात साचलेले पाणीदेखील कमी झाले आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांना वेग आला असून त्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. 

शेतामध्ये चिखलणी, रोपे खणणे आणि लागवडीची कामे सुरू आहेत. एकमेकांना मदत करत शेतीची कामे उरकली जात आहेत. शेतीच्या कामांसाठी पारंपरिक नांगराबरोबरच पॉवर टिलरचाही वापर केला जात आहे. खरीप हंगामात रायगड जिल्हयात साधारण 95 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. दक्षिण रायगडात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर उत्तर रायगडात ५० टक्के लावण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतीची कामे करता करता विरंगुळय़ासाठी पारंपरिक गाणी गुणगुणली जात आहेत. शेतशिवारांमध्ये  अंबोण्यांचे सूर ऐकू येऊ लागले आहेत.

  जून महिन्यात ओढ घेतलेल्या पावसाने जुलै महिन्यात आपली कसर भरून काढली आहे. आतापर्यंत जिल्हयात सरासरी १ हजार ६२३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्हयाच्या एकूण पर्जन्यमानाच्या ५२.३३ टक्के इतका आहे. म्हणजेच दीड महिन्यात निम्म्याहून अधिक पाऊस रायगड जिल्ह्यात बरसला आहे. त्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *