Headlines

ज्योतिष विज्ञान अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या इग्नू इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात शिकवायला ‘महा अंनिस’चा विरोध

ज्योतिष विज्ञान अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या इग्नू इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात शिकवायला ‘महा अंनिस’चा विरोध,भारतीय संविधानने नागरिक कर्तव्य असलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या जबाबदारीशी विसंगत

मुंबई – नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) सन २०२१–२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम ए ज्योतिष) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रह तार्‍यांचा  मानवी जीवनावर होणारा परिणाम,  पंचाग,  मुहूर्त, कुंडली आणि  ग्रहणवेध आदी  विषयांची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी सदर अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे इग्नूने म्हटले आहे.

यापूर्वीचे भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी सन २००१ मध्ये युजीसीच्या माध्यमातून ज्योतिष विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  डॉ जयंत नारळीकर, प्रोफेसर यशपाल आणि देशातील इतर अनेक प्रमुख वैज्ञानिकांनी या निर्णयाला  जाहीर विरोध केल्याने त्यावेळी तो निर्णय सरकारला रद्द करावा लागला होता. तत्पूर्वी सुमारे २५ वर्षे आधी अमेरिकेतील जागतिक स्तरावरच्या ‘द हयुमॅनिस्ट’ मासिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर १९७५ या अंकातून डॉ एस चंद्रशेखर आणि इतर अठरा नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांसह एकूण १८६ प्रथितयश शास्त्रज्ञांनी स्वाक्षर्‍या करून फलज्योतिष विरोधी निवेदन प्रसिध्द केले होते. अतिदूर असणारे तारे किंवा ग्रह मानवी जीवनावर प्रभाव टाकतात, हे असत्य असून फलज्योतिषाच्या भाकीतांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे त्यांनी त्यात ठामपणे नमूद केलेले होते.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेली तीस वर्षे खगोलविज्ञानाचा प्रसार करीत आहे. एवढेच नाही, तर  फलज्योतिषाचा फोलपणा प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर सातत्याने मांडत आलेली आहे. वैज्ञानिकांनी घेतलेल्या या  भूमिकेशी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती सहमत असून सदर अभ्यासक्रमाला ठाम विरोध करत आहे. एका बाजुला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तरूणार्इला सोबत घेऊन चंद्राला अथवा मंगळाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि दुसर्‍या बाजुला इग्नू सारखं नामांकित विद्यापीठ समाजातल्या काही

मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी  तरूणार्इला ज्योतिषाची पदवी बहाल करीत समाजाला  कडक मंगळ आणि शनिच्या साडेसातीत अडकवणार आणि सोडवणार असेल, तर ही कृती संविधानविरोधी आहे. अशा प्रकारच्या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणार्‍या या निर्णयाचा समिती ठाम विरोध करीत आहे. शिक्षणातून शहाणपण येते असा आमचा ठाम विश्वास आहे. मात्र ज्ञानदानाचं अत्यंत महत्वपूर्ण  काम करणार्‍या इग्नुसारख्या विद्यापीठातून समाजाला अंधश्रध्देच्या खोल गर्तेत ढकलणारं शिक्षण देणं ही सरकारची प्रतिगामी कृती आहे.

जागतीक पातळीवर ज्योतिष विषयाला कोणताही शास्त्रीय आणि सैद्धांतिक आधार नाही. असा आधार नसणारा गैरलागू आणि विसंगत अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु करु नये. ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ चालवले जाते, त्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः अत्यंत प्रगतशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नेत्या होत्या. त्या हयात असत्या, तर त्यांनीही या निर्णयाला ठाम विरोधच केला असता.

कोरोनाने निर्माण केलेली बेरोजगारी आणि आर्थिक विवंचना यातून बाहेर पडण्यासाठी धरपडणार्‍या तरूणार्इमध्ये अवैज्ञानिक भाकडकथा रुजवण्याचा प्रयत्न करणार्‍या इग्नूने हा अभ्यासक्रम त्वरीत मागे घ्यावा, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *