Headlines

लग्नासाठी नवरी मिळावी , भावी नवरदेवांचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

प्रातनिधिक फोटो

सोलापूर – आजपर्यंत आपण रोजगार आरोग्य शिक्षण किंवा एखाद्या धार्मिक विषयाला घेऊन आंदोलन होताना मोर्चा होताना पाहिले आहेत. त्यासोबत आपल्या गावातील समस्यांना घेऊन सातत्याने आंदोलन मोर्चा होत असतात. मात्र आज एका आगळ्यावेगळ्या आंदोलनाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. तर चला जाणून घेऊया हे आंदोलन आहे तरी काय..

वय उलटून तरी गेले केवळ मुली मिळत नसल्याने लग्नापासून वंचित राहत असलेल्या तरुणांसाठी व गर्भलिंग निदान चाचण्यावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दि. २१ दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट नवरदेवांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी होणार असून हा देशातील पहिला अनोखा मोर्चा असणार आहे.

मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. बारसकर यांनी याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदन पुढीलप्रमाणे – राज्यामध्ये मुलींची संख्या कमी असून मुलांची संख्या जास्त असल्याने अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे दुरापास्त झाले आहे. मुलांची लग्न होत नसल्याने त्यांच्या आई वडिलांच्या काळजीत वाढ होऊन त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक विकार जडले आहेत. गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत सर्व सामान्यांना अनेक समस्या आहेत, प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पातळीवर उपाय शोधून त्यातून मार्ग काढत असतो. गर्भलिंग निदान न करण्याचा शासनाने कायदा केला आहे परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. गर्भपाताचे प्रमाण वाढल्याने मुलींची संख्या घटते आहे, त्याचाच हा परिणाम असल्याचे बारसकर यांनी सांगितले.

कुटुंबीय चिंतीत – विवाह योग्य वयात मुलाचा विवाह न झाल्यास अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागणार आहे, हा सर्वात मोठा धोका आहे. वेळप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत विवाह न झाल्याने मुलाचे आई-वडील चिंताग्रस्त होत असून, त्यांच्यात रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे दवाखान्याच्या नाहक खर्चाला सामोरे जावे लागत आहे.

तरुणांमध्ये व्यसनाधीनता – आपला विवाह वेळेत न झाल्याने व इतरांचे संसार पाहून अनेक युवक व्यसनाधीन झाले आहेत. मुलाचा विवाह रखडल्याने आई-वडिलांनाही इतर कार्यक्रमात जाण्याची पंचायत झाली आहे. गेले तर खाली मान घालून बसावे लागते. श्रीमंतांच्या मुलांचे विवाह होतात, कारण त्यांच्याकडे सर्व सुख सोयी असतात, मात्र गरीबाचा छोटासा व्यवसाय असतो, शेती असते त्याची आर्थिक परिस्थिती कुमुकवत असल्याने विवाह होण्यास विलंब लागतो. विवाहयोग्य वयात वधू मिळत नाही तसेच त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत. त्या अपेक्षा मुलाकडून पूर्ण होत नाहीत. परिणामी, विवाह रखडत आहेत. या सर्वावर कुठे तरी उपाय योजना व्हावी, यासाठी नवरदेवाच्या वेशात कपाळाला मुंडावळी बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केल्याचे बारसकर यांनी सांगितले. यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शीलवंत क्षीरसागर, नगरसेवक अतुल क्षीरसागर, तन्वीर शेख आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *