Headlines

मायेचं आभाळ बाप माझा : बहारदार कविसंमेलन संपन्न

उस्मानाबाद- येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात बाप माझा मायेचं आभाळ हा आशय घेऊन निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न झाले.महाविद्यालयातील मराठी विभाग व अक्षर मानव उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. आई आणि वडील हा विषय केंद्रस्थानी ठेवून पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन प्रा. धनंजय लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रुपेशकुमार जावळे हे उपस्थित होते.उद्घाटन पर विचार व्यक्त करताना प्रा.लोंढे यांनी वर्तमान समाजात या विषयाच्या अनुषंगाने समाजजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

माणूस स्वार्थ आणि मतलब च्या पाठीमागे धावू लागला आहे, त्यामुळेच आज माणसात माणुसकी उरलेली नाही. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पैसा हा वापरण्यासाठी असतो तर माणूस प्रेम करण्यासाठी, पण आज हा व्यवहार उलटा झाला आहे. माणूस पैशावर प्रेम करू लागला आहे तर माणसाचा वापर केला जाऊ लागला आहे. वर्तमान समाजाची ही शोकांतिका आहे.असे मत त्यांनी आपल्या उद्घाटनपर विचारातून व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ .प्रशांत चौधरी यांनी साहित्यविषयक उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने राबविण्यात यावेत, या प्रत्येक उपक्रमासाठी आमचे महाविद्यालय आणि या महाविद्यालयातील सर्व यंत्रणा सतत आपल्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन देऊन साहित्य, व्यवहार आणि माणूस याविषयीचे आपले विचार व्यक्त केले.

या कवी संमेलनात उस्मानाबाद शहर व ग्रामीण भागातील अनेक विविध कवी सहभागी झाले होते. आई आणि वडील या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयावर हे कवी संमेलन संपन्न झाल्यामुळे अत्यंत भावपूर्ण आणि प्रसन्न वातावरणात वेगवेगळ्या कविता आणि गझल यांची उधळण निमंत्रित कवींनी करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमंत्रित कवी मध्ये भागवत घेवारे, सुभाष चव्हाण, बाळा पाटील, दास पाटील शेखर गिरी, स्नेहलता झरकर ,अपर्णा चौधरी, कविता पुदाले, सुवर्णा शिनगारे , अश्विनी धाट, श्याम नवले, अविनाश मुंडे, कृष्णा साळुंखे, प्रगती साळुंखे, संजना कदम, यूसूफ सय्यद, मधुकर हुजरे यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण केले.या कार्यक्रमात नव्या आणि जुन्या कवींच्या विचारांची मेजवानी प्रदीर्घ काळानंतर उस्मानाबादमधील रसिक श्रोत्यांनी मनमुरादपणे घेतली. कार्यक्रमाला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सहदेव रसाळ यांनी केले तर सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी तर आभार अरविंद हंगरगेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *