Headlines

लातूर-टेंभुर्णी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मुहूर्त मिळेना ; ३० वर्षे प्रश्न प्रलंबित

[ad_1]

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर  : लातूर ते टेंभुर्णी रस्ता रुंदीकरणाची गेल्या नोव्हेंबरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लातूर येथे या रस्ता रुंदीकरणाची घोषणा केली होती, मात्र गेल्या ११ महिन्यांत या घोषणेचे पुढे काहीच झाले नाही. गेली ३० वर्षे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे भिजत घोंगडे कायम आहे. परिणामी २०२४ पूर्वी या रस्ता रुंदीकरणाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.

लातूरहून पुणे, मुंबईला जाण्यासाठी बार्शी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी हाच रस्त्याचा मार्ग होता. रेल्वे रुंदीकरण मार्गी लागल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरणही व्हावे यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात १९९९ मध्ये टेंभुर्णी ते नांदेड  रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.  खासगीकरणातून हा रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न झाले, मात्र  २००३ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले व हे काम तसेच रेंगाळत पडले.

२००४ मध्ये विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी टेंभुर्णी ते नांदेड हा रस्ता चौपदरी व बीओटीमध्ये करावा यासाठी कंत्राटदार नियुक्त केला, मात्र त्या कंत्राटदाराने काम सुरू करण्याच्या टप्प्यातच विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद पुन्हा गेले व ते काम तसेच रेंगाळले, प्रकरण कोर्टात गेले. २०१३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग हा जाहीर झाला. सोलापूर ते नांदेड  डांबरीकरण झाले व त्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण झाले, मात्र लातूर-टेंभुर्णी या रस्त्याचे काम हे तसेच रेंगाळले. टेंभुर्णी ते कुर्डुवाडीपर्यंत व कुर्डुवाडी ते बार्शीपर्यंत काही प्रमाणात रस्ता दुरुस्त झाला, मात्र पूर्ण एकत्रित रस्ता लातूर ते टेंभुर्णी याचे मात्र काम मार्गी लागले नाही. खास करून एडशी ते लातूर हा रस्ता एकपदरीच राहिला, जुने दगडी अरुंद पूल हे तसेच राहिले. ते दुरुस्त करण्यासाठीदेखील निधी कोणी खर्च करायला तयार नाही. २०१६ नंतर टेंभुर्णी ते बार्शी हा रस्ता काही प्रमाणात मार्गी लागला. या रस्त्याचे दुपदरी काम करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला व त्याचे काही प्रमाणात काम सुरू झाले. मात्र जोपर्यंत लातूर ते टेंभुर्णी हा चौपदरी रस्ता होत नाही तोपर्यंत नांदेडपासून येणाऱ्या लोकांचा पुणे-मुंबईला जाणारा रस्त्याचा मार्ग सुकर होणार नाही, अशी सर्वाचीच मागणी होती.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे आपल्या विविध कामांचा शुभारंभ करण्यासाठी लातुरात आल्यानंतर लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांच्याकडे एकमुखी लातूर -टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी करण्यात आली व त्याच ठिकाणी त्यांनी हा रस्ता चौपदरी होईल, असे जाहीर केले. मंत्र्यांनी या रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. संबंधित कंपनीबरोबर तसा करारही झाला आहे, मात्र गेल्या ११ महिन्यांत अद्याप प्रकल्प अहवाल तयार झालेला नाही.  टेंभुर्णी ते बार्शीदरम्यानचे काम काही प्रमाणात सुरू झाले आहे, मात्र बार्शी ते येडशी व येडशी ते लातूर या टप्प्यातले दुपदरीकरणाचे कामदेखील सुरू झालेले नाही. काही ठिकाणी ठिगळ लावण्याची कामे होत आहेत, त्यामुळे लातूर ते टेंभुर्णी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा पल्ला कधी गाठणार, हा एक प्रश्नच आहे. या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी या भागातले लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करतात, हाही एक प्रश्नच आहे. सत्ताधारी असो अथवा विरोधक, या लोकप्रतिनिधींनी याचा योग्य पाठपुरावा केला नाही तर प्रश्न मार्गी लागत नाहीत. पुण्याला व मुंबईला जाण्यासाठी मार्गे सोलापूर हा पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे व त्या रस्त्याचा लोक वापर करत आहेत. २०२४ पूर्वी तरी या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र याबाबतीत अद्याप तरी काही हालचाल होत असल्याचे दिसून येत नाही. उजनीचे पाणी व टेंभुर्णीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण हे लातूरकरांसाठी गेल्या पाच निवडणुकांपासून आश्वासनच राहिले आहे. ते अद्यापि पुढच्या निवडणुकीतही कायम राहिले आहे.

टेंभुर्णी ते बार्शी रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचे काम वेगात

टेंभुर्णी ते बार्शीपर्यंत रस्त्याचे दुपदरीकरण करण्यासाठीचे काम सुरू झाले आहे. नगरच्या कंत्राटदाराने ८४ कोटी रुपयांना हे कंत्राट घेतले आहे. शासकीय दराच्या ३९ टक्के कमी दराने हे काम घेतले आहे. डांबरीकरणाचे हे काम मार्गी लागेल. चौपदरीकरणाच्या कामाला किमान आणखीन तीन वर्षे लागतील. त्याचा अद्याप प्रकल्प अहवालही झाला नाही. सर्वानी मिळून या कामाचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.

बबनराव शिंदे, आमदार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *