Headlines

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदासाठी आमदारांना डोहाळे | In the Shinde Fadnavis government MLAs are vying for ministerial posts msr 87

[ad_1]

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक आमदारांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. तसे प्रयत्न या आमदारांकडून सुरू झाले आहेत.

जिल्ह्यात शिंदे गटासोबत गेलेले शिवसेनेतील एकमेव आमदार संजय राठोड आहेत. भाजपात विधानसभेचे पाच व विधानपरिषदेतील एक असे सहा आमदार आहेत. यातील तिघांनी मंत्रीपदासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण राजकारण हे जातीय समीकरणांवर आधारित आहे. त्यामुळे राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी जिल्ह्यात किमान एक ते दोन मंत्रीपद कायम असतात. २०१४ मध्ये युती सरकारच्या काळात जिल्ह्यात एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रीपद होते. संजय राठोड यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपद व पहिली दोन वर्षे यवतमाळचे पालकमंत्रीपद होते. त्यानंतर मदन येरावार यांची राज्यमंत्री म्हणून आणि यवतमाळचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. युतीच्या अखेरच्या काळात राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके यांची आदिवासी विकासमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ मध्ये झालेल्या संत्तातरणात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळून यवतमाळचे पालकमंत्रीपद मिळाले. मात्र दोनच वर्षात त्यांना एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून त्यांचे मंत्रिमंडळात जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

आता नव्यानेच झालेल्या सत्तांतरणात राठोड यांच्यासह भाजपातील मदन येरावार, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे यांच्यासह भाजपचे विधानपरिषदेचे ॲड. निलय नाईक यांची नावे चर्चेत आहेत. राठोड हे शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवाय बंजारा समाजाचे नेते म्हणून राठोड यांचे राज्यात वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येरावार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संघाच्याही जवळचे आहेत. ते यापूर्वी दोनवेळा राज्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे.

शिंदे-फडणवीस ‘’महाशक्ती’’च्या भेटीला, मंत्रिमंडळ विस्तारावर कोणाचे वर्चस्व?

जातीय बाब लक्षात घेऊन आदिवासी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा विचार झाला तर आ. डॉ. अशोक उईके यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रीपदाची माळ पडू शकते. दुसरीकडे आदिवासी समाजातूनच आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनीही मंत्रीपदासाठी प्रयत्न चालविले आहेत. याशिवाय राठोड यांचे बंजारा समाजातील वर्चस्व कमी करून या समाजाला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी पुसद येथील आ. ॲड. निलय नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. बंजारा समाजाचे नेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आ. निलय नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. दुसरीकडे येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टचे झेंडावंदन पालकमंत्री म्हणून आपल्याच हातून होईल, असा दावा शिंदे गटातील एका आमदारासह भाजपातील चार आमदार आपल्या कार्यकर्त्यांकडे करीत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *