Headlines

गोगलगाईंच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त

[ad_1]

प्रदीप नणंदकर

लातूर : शेतीच्या प्रश्नांची शृंखला कधी थांबत नाही दरवर्षी प्रश्न नवीन रूप घेऊन समोर उभे राहतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांशी झगडण्यातच शेतकरी थकून जातो आहे. कधी अवर्षण कधी, अतिवृष्टी याची आता शेतकऱ्याला सवय झाली आहे. या वर्षी पावसाने महिनाभर हुलकावणी दिली, काही भागांत पाऊस झाला म्हणून काहींनी पेरण्या केल्या तर काही भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नाही म्हणून पेरण्याच करता आल्या नाहीत. त्यातच गोगलगाईंचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.  गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर एक नवाच प्रश्न आ वासून उभा आहे. ‘गोगलगाय आणि पोटात पाय’ अशी आपल्याकडे म्हण आहे. आपल्या आगमनाचा सुगावा लागू न देता, चोरपावलाने अचानक हल्ला करणे असा या म्हणीचा अर्थ. त्याची अनुभूती अनेक गावांतील शेतकरी घेत आहेत. लहानपणी पावसाळय़ात  गावात गोगलगाई दिसायच्या आणि लहान मुले त्यासोबत खेळायचे. त्या इतक्या उपद्रवी असू शकतात याची पुसटशी कल्पना कोणाला नव्हती.

 तीन वर्षांपूर्वी मराठवाडय़ातील जवळपास सर्व जिल्ह्यांत दखल घ्यावी असा गोगलगाईचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्या कोवळी पिके खाऊन नष्ट करू लागल्या .तो प्रादुर्भाव दरवर्षी वाढतो आहे. या वर्षी गोगलगाईने उग्ररूप धारण केल्याचे केल्याचे दिसून येत असून गावोगावी शेतकऱ्यांचे कोवळे पीक त्या खाऊन टाकत आहेत. अगोदरच वन्य प्राणी यांच्या हल्ल्याने शेतकरी त्रस्त आहेत. हरीण, मोर, रानडुक्कर, वानर, माकड, रानससा व आता गोगलगाईमुळे तो पुरता घायकुतीला आला आहे.

 लातूरच्या कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले हा प्रश्न गेल्या दोन-तीन वर्षांपासून उग्र बनतो आहे .गोगलगाईचे मुख्य अन्न हे गवत आहे. मात्र शेतीतील तण कमी करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतात. त्यात प्रामुख्याने गेल्या काही वर्षांत तणनाशकांचा वापर केला जातो आहे, त्यामुळे गवत कमी झाले आहे. गोगलगाईंना आता त्या जिवंत राहायचे असतील तर त्यांना काहीतरी खायला हवे त्यामुळे शेतात असणाऱ्या  असणाऱ्या कोवळय़ा पिकांचा  त्या फडशा  पाडताना दिसून येतात .कीटक शास्त्रज्ञांबरोबर आमचा या संबंधातला संवाद सुरू आहे त्यांनी केलेल्या अभ्यास आणि निष्कर्षांवर आम्ही काही अंदाज बांधत आहोत. मात्र गोगलगायीचा प्रादुर्भाव नेमका मोठय़ा प्रमाणावर का होतो आहे यासंबंधी निश्चित निष्कर्षांप्रत अजून शास्त्रज्ञ आलेले नाहीत असे गुट्टे म्हणाले. पावसाचा ताण असला की गोगलगाईची उत्पत्ती होते व पाऊस पडल्यानंतर त्या मोठय़ा प्रमाणावर आपल्या अन्नाच्या शोधात भटकतात व दिसेल त्याचा फडशा पाडतात.

  या वर्षी सोयाबीनच्या पिकाला यापासून मोठय़ा प्रमाणावर धोका आहे. सर्वच पिकांना गोगलगाईपासून धोका असल्याचे ते म्हणाले. गोगलगायवरती उपाय म्हणून ‘स्नेक किल’ नावाचे औषध बाजारात उपलब्ध आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन त्याचे भाव वाढलेले आहेत ते गोळय़ांच्या स्वरूपात आहे. दुकानातून खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पाच फुटांच्या अंतरावर ती गोळी टाकण्याचा सल्ला दुकानदार देतात. डॉ. गुट्टे म्हणाले की एका एकरमध्ये एक किलो गोळय़ाची गरज आहे, त्या गोळय़ा पाच फूट अंतरावर टाकायच्या ठरल्या तर त्या पुरणार नाहीत म्हणून त्या गोळय़ांची पावडर करावी. साधारणपणे चार ते पाच किलो खराब ज्वारीचे भरड करून त्यात ती पावडर मिसळावी व त्याचे छोटे छोटे गोळे करून दोन ओळीच्या अंतरावरती ते टाकले गेले पाहिजेत. दोन किलो भरडीमध्ये शंभर ग्रॅम पावडर याप्रमाणे त्याचे स्वरूप ठेवावे व शेतातील ओळीच्या बाजूला ही पावडर किंवा गोळे टाकावेत कारण हे गोगलगाईचे अतिशय आवडते अन्न आहे. त्यामुळेच ते तयार करण्यात आले आहे. याच्या संपर्कात गोगलगाई येतात व ते खाल्ल्यानंतर त्या लवकर मरतात.

याचबरोबर दुसरा उपाय आपल्याकडे सुतळीचे पोते जुने असतील तर ते गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून शेतात जागोजागी टाकावे या पाण्याच्या आकर्षणामुळे रात्री गोगलगाई या पोत्याच्या खाली येऊन बसतात आणि दुसऱ्या दिवशी मग या गोगलगाई एकत्र करून त्या नष्ट करायला हव्यात.

शेतकरी अडचणीत

मुळात गोगलगाईचा उद्रेक का होतो आहे, आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत कीटकांची पिढीच्या, पिढी उद्ध्वस्त करत असल्यामुळे अस्तित्वाची लढाई म्हणून हवामानात हे बदल होत आहेत का, भविष्यात यावरती उपाययोजना काय करावी लागेल असे नेमके वेगवेगळे कीटक पुन्हा निर्माण व्हायला लागले तर त्याच्याशी झुंज द्यायची कशी व शेती करायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. अगोदरच भांडवली गुंतवणुकीमुळे शेतकरी अडचणीत आहे, सर्व प्रकारचे खर्च वाढले आहेत व त्या मानाने शेतमालाला भाव येत नसल्यामुळे शेतकरी  आतबट्टय़ात आहे. आता अगदी पेरणीच्या पहिल्या टप्प्यातच गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मराठवाडय़ातील सर्व शेतकरी त्रस्त आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *