Headlines

“भाजपाने उमेदवार मागे घ्यावा”, राज ठाकरेंच्या पत्रावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “थोडा उशीर…” | First reaction of Shivsena MP Arvind Sawant on MNS Chief Raj Thackeray letter to BJP over Andheri election

[ad_1]

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी देत दंड थोपटले. मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावरूनच भाजपाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून देत पत्र पाठवलं. या पत्रावर आणि मनसेच्या भूमिकेवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१६ ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.

अरविंद सावंत म्हणाले, “थोडा उशीर झाला. मात्र, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण सातत्याने अशा निवडणुका बिनविरोध करत आलो. मात्र, भारतीय जनता पार्टीची संस्कृती ती नाही.”

“भाजपाने कोल्हापुरात काय केलं हे आठवतं का?”

“भाजपाने कोल्हापुरात काय केलं हे आठवतं का? खरंतर ती जागा शिवसेनेची आहे. त्यावेळी आम्ही पराभूत झालो होतो आणि काँग्रेसचे जाधव निवडून आले होते. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी जयश्री यादव उभ्या राहिल्या. त्यावेळी शिवसेनेने दिलखुलासपणे पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा दिला नाही, तर सक्रीय पाठिंबा दिला. तिथं शिवसैनिकांनी खूप काम केलं. ती निवडणूकही बिनविरोध झाली पाहिजे होती. मात्र, तिथे निवडणूक झाली आणि त्या विजयी झाल्या,” असं मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं.

“ही सत्तेसाठी हपापलेली लोकं आहेत”

“या घटनांवरून भाजपाचं मन किती शुद्ध आहे हे महाराष्ट्र ओळखतो. ही सत्तेसाठी हपापलेली लोकं आहेत. यापलिकडे काहीही नाही. त्यांना दुसरं कुणाचं भलं वगैरे काहीही सुचत नाही. त्यांनी माणूसकी तर केव्हाच हरवली आहे. निदान मनसेच्या पत्राने हा अंश कुठेतरी दिसतो याचा आनंद वाटला,” असंही सावंतांनी नमूद केलं.

“ही भूमिका मांडायला थोडा उशीर झाला”

राज ठाकरे अंधेरीत शिवसेनेला पाठिंबा देतील का? असा प्रश्न विचारला असता अरविंद सावंत म्हणाले, “अंधेरीत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ही पहिली भूमिका मांडली त्याला थोडा उशीर झाला. असं असलं तरी ही भूमिका स्वागतार्ह आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांनी या संस्कृतीची भाजपाला आठवण करून दिली हेही खूप झालं.”

“शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवायला लावलं, मग निवडणुकीत उभे राहिले का?”

“उशीर झाला हे मी म्हटलो कारण उमेदवारी अर्ज भरूपर्यंत बराच वेळ गेला. मधल्या काळात तमाशा करण्यात आला. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे विधानसभेची निवडणूक लागली आहे असं सांगत शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवायला लावलं. ते उभे राहिले का? हा प्लॅन कोणाचा? हे षडयंत्र भाजपाचंच होतं. शिंदे गट हातातील बाहुले आहेत. त्यांचा वापर करून शिवसेनेचं खच्चीकरण सुरू आहे. हे एकच भाजपाचं उद्दिष्ट आहे,” असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.

हेही वाचा : मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला…”

“भाजपाने शिवसेना संपवण्यासाठी शस्त्र म्हणून एकनाथ शिंदेंचा वापर केला”

“भाजपाने एकदाही म्हटलं नाही की आम्ही निवडणूक लढणार आहोत की नाही. तेव्हा शिंदे गटाला झुंजवत ठेवलं. त्यांचा हेतू शिवसेना संपवायची हाच होता. त्यासाठी त्यांनी शस्त्र म्हणून एकनाथ शिंदेंचा वापर केला,” असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *