Headlines

रोग अन्वेषण विभागाच्या जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणी प्रकल्पाचे रविवारी भूमीपूजन – महासंवाद

[ad_1]

पुणे, दि. 4 : पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे राज्यात पशुरोग निदानासाठी राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत औंध येथील रोग अन्वेषण विभाग येथे जैव सुरक्षा स्तर 2 आणि 3 प्रयोगशाळा उभारणी प्रकल्पाचे भूमीपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन रविवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

राज्यात पशुरोग निदानासाठी रोग अन्वेषण विभाग ही शासनाची एकमेव राज्यस्तरीय प्रयोगशाळा कार्यरत आहे. प्रयोगशाळेस राष्ट्रीयस्तरावर पश्चिम विभागीय रोग निदान प्रयोगशाळेचा दर्जा प्राप्त आहे. प्रयोगशाळेत 10 विभाग आहेत. प्रयोगशाळेद्वारे पशुरोगाचे वेळेत निदान करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निष्कर्ष कळविल्यामुळे उपचार व रोग नियंत्रण सोईचे होते. यामुळे पशुपालकांचे होणारे नुकसान कमी होते. या प्रयोगशाळेत राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत जैव सुरक्षा स्तर प्रयोगशाळा उभारणी प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यावर 75 कोटी 61 लाख रुपये खर्च होणार आहे. 2022-23 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने होणार

जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळांना ब्रुसेल्लॉसिस, लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंजा, रेबीज आदींचे रोग नमुने निदानासाठी पाठवता येणार आहे. प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणामुळे पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावयास मदत मिळेल.

पर्यावरण व मानवी आरोग्य संरक्षणाच्या सुविधा

लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंझा, अॅग्रॅक्स, ग्लँडर आदी रोग त्याचप्रमाणे पशुधनात नव्याने उद्भवणाऱ्या रोगांचे संक्रमण पशुधनातून मानवास होण्याची शक्यता असते. या रोगांच्या निदानासाठी नियंत्रित वातावरणाच्या प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावरील विविध रोगांचा उद्गम प्राण्यामध्ये दिसून येतो. पर्यावरण व मानवी आरोग्य संरक्षणाच्या सुविधा व अत्याधुनिक उपकरणांनी अद्ययावत प्रयोगशाळेच्या वापरातून पशुरोग निदान चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 61 कोटी 28 लाख रुपयाची तरतूद उपलब्ध करून पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत आदर्श उत्पादन पद्धतीच्या मानकांचा (जी.एम.पी.) अवलंब करुन कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळांची टर्न की आधारावर उभारणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये आदर्श उत्पादन पद्धतीच्या विविध मानकांचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रयोगशाळेतील वातावरण पूर्णपणे निर्जंतूक ठेवण्यात आले आहे. लस उत्पादनासाठी पोषक तापमानाचे नियमन करण्यात आले आहे. अंशतः स्वयंचलीत तत्वावर चालणारी अत्याधुनिक सयंत्रे व उपकरणे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जेणेकरून उत्पादीत होणारी लस ही पूर्णपणे निर्जंतूक राहून लसीची गुणवत्ता उच्च प्रतीची असेल. प्रयोगशाळेतील सर्व कामकाज हे बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीम या केंद्रीय संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित करण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. कुक्कुट पक्ष्यातील मानमोडी, लासोटा, कोंबड्याची देवी, मरेक्स या तर शेळ्या-मेंढ्यातील देवी व पीपीआर या रोग देवी प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

या लसी अतिशय गुणवत्तापूर्ण होणार असल्याने शेतकऱ्यांकडील कोंबड्या आणि शेळ्या-मेंढ्यामध्ये संबंधित रोगाविरुध्द उच्च प्रतीची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होईल, रोगप्रादूर्भाव रोखण्यास मदत होईल. त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास व शेतकऱ्यांच्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होईल. या प्रयोगशाळाच्या उभारणीमुळे संस्थेत उत्पादित करण्यात येत असलेल्या कुक्कुट व शेळ्या-मेंढ्याच्या लसीच्या उत्पादनाची क्षमता 5 पटीने वाढून प्रतिवर्षी 12 कोटी 50 लाख लसमात्रा इतकी होणार आहे. उत्पादन क्षमतेमधील होणाऱ्या वाढीमुळे राज्याची लसींची गरज 100 टक्के भागून अतिरिक्त लसी राज्याबाहेर विक्रीसाठी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

00000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *