Headlines

दिल्ली, उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक वाहनचोऱ्या

[ad_1]

अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : चोरी गेलेल्या वाहनांची २४ तासांत विल्हेवाट लावणाऱ्या टोळय़ा महाराष्ट्रात सक्रिय झाल्या आहेत. या वाहनचोरांच्या टोळय़ांनी राज्यात हैदोस घातल्यामुळे वाहनचोरीमध्ये राज्य तिसऱ्या  क्रमांकावर पोहोचले आहे. राज्यातून जवळपास २५ हजार ७०० वाहने चोरी गेल्याची नोंद पोलिसांकडे आहे, तर उपराजधानी नागपुरातून तीन वर्षांत ३६०० वाहनांची चोरी झाली आहे.

देशभरातून प्रतिवर्ष १ लाख ९० हजारांवर चारचाकी आणि दुचाकी वाहने चोरी होतात. वाहनचोर ‘स्मार्ट’ झाले असून ‘मास्टर की’ आणि विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांची चोरी करीत असल्याची बाब समोर आली आहे. वाहन चोरी करण्यासाठी टोळय़ांमधील सदस्य वेगवेगळे कौशल्य वापरतात. चोरीनंतर २४ तासांत वाहनाची विल्हेवाट लावण्यात येत असल्यामुळे चोरांच्या टोळय़ा पोलिसांच्या हाती सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. चोरी केलेल्या वाहनांचा तपास खूप किचकट असून वाहने हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी खूप आटापिटा करावा लागतो. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी वाहनचोरीच्या तपासाकडे दुर्लक्ष करतात. देशात वाहन चोरी होण्याचे सर्वाधिक प्रमाण नवी दिल्लीत असून येथे ४० हजारांवर वाहने वर्षांकाठी चोरी होतात. द्वितीय क्रमांकावर उत्तरप्रदेश असून येथून २६ हजारांवर वाहने चोरी झाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यातून २४ हजारांवर वाहने चोरी झाल्याची नोंद असून राज्यात मुंबई पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथा क्रमांक राजस्थान आणि पाचव्या क्रमांकावर कर्नाटक आहे.

नवीन पद्धत

वाहन चोरांच्या टोळय़ा शहरात दाखल होऊन काही दिवस टेहळणी करतात. त्यानंतर रस्त्यांचा अभ्यास करून महागडय़ा कारवर लक्ष केंद्रित करतात. नियोजन करीत ‘मास्टर चावी’चा वापर करून कार चोरतात. पोलिसांत तक्रार होण्यापूर्वीच ती कार राज्याच्या सीमेवर पोहचवतात. तेथून दुसरी टोळी बनावट नंबर प्लेट लावून कार दुसऱ्या राज्यात नेते. तेथे आरटीओ एजंटच्या मदतीने बनावट क्रमांकाची कागदपत्रे बनवली जातात. कारचा रंग बदलण्यात येतो. अशाप्रकारे फक्त चोवीस तासांत कारची अन्य राज्यात विक्री केली जाते.

मागणीनुसार पुरवठा

वाहनचोरांच्या टोळय़ा मागणीनुसार कारची चोरी करीत असल्याचे नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी पकडलेल्या टोळीच्या चौकशीतून समोर आले. कारचोरीच्या धंद्यात कमी मेंटेनस आणि अधिक किंमत असलेल्या वाहनांना अधिक मागणी असते. त्याचप्रमाणे जास्त प्रवासी संख्या असलेल्या वाहनांचीही मागणी जास्त असते. फॉर्च्यूनर, इनोव्हा, बोलेरो, क्वालिस, तवेरा, एर्टिगा, झायलो ही वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. कारची मागणी केल्यानंतर अगदी दोन ते तीन दिवसांत ती उपलब्ध करून देण्याइतपत वाहन चोरांच्या टोळय़ांची मजल गेली आहे.

पोलिसांची निष्क्रियता

राज्यातील प्रत्येक शहरात वाहनचोरीचे वाढते गुन्हे पाहता पोलिसांनी वाहन चोरी विरोधी पथके स्थापन केली आहेत. परंतु, अशा पथकांचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळेच परराज्यातील टोळय़ांचे फावते. फक्त ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या भरोशावर पोलिसांचे काम चालते. त्यामुळे वाहन चोरांच्या टोळय़ा पोलिसांना नेहमी गुंगारा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

आकडे काय सांगतात?

* एकूण वाहने : १ लाख ९५ हजार

* दुचाकी : १ लाख ६६ हजार

* चारचाकी : १६ हजार ३५४

* मालवाहू वाहने : ३ हजार ४९४

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *