Headlines

दुर्धर आजारी रुग्णांसाठी आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मॉर्फिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय!

[ad_1]

संदीप आचार्य

अलिबाग येथील रुग्णालयात सत्तरीचे जाधव कर्करोगामुळे असह्य वेदनांनी तळमळत होते. आजार शेवटच्या टप्प्यात आला होता. वेदना थांबाव्यात एवढीच त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने वेदनाशामक मॉर्फिन इंजेक्शन नसल्यामुळे डॉक्टरही हताशपणे त्यांच्या वेदना पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हते. आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच डॉक्टरांकडे मॉर्फिन इंजेक्शनचा साठा करण्याचे परवाने असल्यामुळे वेदनेने त्रस्त दुर्धर आजारी रुग्णांना ‘पॅलेटिव्ह केअर’ मिळण्याबाबत काही मुद्दे कालपर्यंत अनुत्तरित होते. मात्र आरोग्य विभागाने आता याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबरोबरच संबंधित सर्व रुग्णालयांना ‘मॉर्फिन’साठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अर्ज करण्यास सांगितल्याने हा प्रश्न आता मार्गला लागला आहे.

कर्करोग, एचआयव्ही, टीबी, वद्धापकाळातील अपंगत्व, यकृताचे आजार आदी वेगवेगळ्या आजारांनी मृत्यूच्या दारातातील रुग्णांच्या वेदना कमी व्हाव्या यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केले जातात. यात वेदनाशामक औषधांचाही समावेश असला तरी अशा रुग्णांना देण्यात येणाऱ्या मॉर्फिन इंजेक्शन खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयांकडे नसल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले. मात्र गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी घेतलेल्या राज्यस्तरीय बैठकीत आरोग्य विभागाच्या ज्या रुग्णालयांमध्ये यापुढे पॅलेटिव्ह केअर उपचार दिले जाणार आहेत त्या सर्व रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासनाकडे मॉर्फिनसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास २१२ डॉक्टर तसेच ‘फडीए’चे सहआयुक्त या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.

राज्यात २०१२ साली आरोग्य विभागाने ‘पॅलेटिव्ह केअर’ योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात केली होती. नियमानुसार कालपर्यंत या योजनेतील डॉक्टरांना मॉर्फिन इंजेक्श्न देण्यासाठी परवाना घेण्याचे धोरण होते. मात्र प्रत्यक्षात १७ जिल्ह्यात ही योजना सुरु असतानाही केवळ वर्धा, गडचिरोली व जव्हार येथील वैद्यकीय अधीक्षकांच्या नावे मॉर्फिन इंजेक्श्न खरेदी करण्याचा परवाना होता. आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यात आता पॅलेटिव्ह केअर योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी डॉक्टर, परिचारिका तसेच आशांसह सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले. ही योजना सुरु झाली त्यावेळी ठराविक रुग्णालयांतच राबविण्यात येत असल्यामुळे तेथील संबंधित डॉक्टरांच्या नावे मॉर्फिन खरेदीसाठी परवाना घेण्यात आले होते. मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याने आम्ही याचा सर्वंकश आढावा घेतला असून यापुढे आरोग्य विभागाच्या ज्या रुग्णालयात वा संस्थेत ही योजना राबविण्यात येईल त्यांच्या नावे परवाना घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना जारी करण्यात आल्याचे डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे मॉर्फिन इंजेक्श्न नसले तरी वेदनाशामक ‘ट्रॅमाडोल’ वा फोर्टक्विन आदी औषधे आहेत व ते अशा रुग्णांना देण्यात येतात. प्रत्येक जिल्ह्या रुग्णालयात‘पॅलेटिव्ह केअर’साठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, चार परिचारिका, बहुउद्देशीय अधिकारी व साहाय्यक असा कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला असून मॉर्फिन वगळता रुग्णांना आवश्यक असणारी अन्य सर्व औषधे पुरेशा प्रमाणात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतामध्ये आजघडीला ‘पॅलेटिव्ह केअर’ची गरज असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास एक कोटीपेक्षा जास्त असून केंद्र शासनाने २०१२ साली देशातील १८० जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना सुरू केली होती. त्यानुसार राज्यात १७ जिल्ह्य़ांमध्ये ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना राबविण्यात येत होती. मात्र आता ही याची वाढती गरज लक्षात घेऊन ही योजना राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

पॅलेटिव्ह केअर हे वैद्यकीय शास्त्रातील असे क्षेत्र आहे जे केवळ दुर्धर आजारांवर उपचार करत नाही तर वेदनांपासून रुग्णाला आराम मिळवून देण्याबरोबरच मानसिक वेदना कमी करण्यासही मदत करते. यात केवळ रुग्णाचा विचार करून चालत नाही तर कुटुंबातील अन्य व्यक्तींचाही विचार करावा लागतो. घरातील अन्य वद्ध तसेच लहान मुलांचे मानसिक आरोग्य या काळात व्यवस्थित राहणे आवश्यक असते. यासाठी विशेष प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी यांची आवश्यकता असून आरोग्य विभागाने यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच आशांपासून यंत्रणेतील अनेकांना पॅलेटिव्ह केअर विषयक प्रशिक्षण तर दिलेच. शिवाय घरोघरी जाऊन अशा प्रकारचे रुग्ण आहेत का, याची माहिती घेण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.

दीर्घ व गंभीर आजारांचे रुग्ण आशा तसेच एएनएमच्या मदतीने शोधून त्यांना आरोग्य सेवा देण्याबरोबरच घरातील व्यक्तींना आवश्यक आरोग्य विषयक मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तसेच औषधोपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेची यशस्वीता ही आशा कार्यकर्त्यांवर अवलंबून असल्यामुळे आशांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात पॅलेटिव्ह रुग्णांसाठी दहा खाटांची व्यवस्था करण्यात असून या योजनेने मागील दोन वर्षात वेग घेण्यात सुरुवात केल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.

एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात आतापर्यंत दहा हजार ९७१ पॅलेटिव्ह केअर आवश्यक असलेल्या रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आले वा दाखल करण्यात आले तर ५५९९ रुग्णांच्या घरी जाऊन पॅलेटिव्ह केअरच्या पथकातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन भेटी दिल्या. याशिवाय ८३२७ रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम करण्यात आले. आजघडीला देशत १२ टक्के रुग्णांना पॅलेटिव्ह केअरची आवश्यकता असली तरी प्रत्यक्षात चार टक्के रुग्णांनाही ही व्यवस्था उपलब्ध होत नाही. महाराष्ट्रात ही योजना परिणामकारकपणे राबवून दुर्धर आजारांच्या जास्तीतजास्त रुग्णांवर उपचाराची फुंकर घातली जातली जाईल असे डॉ पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *