Headlines

सोलापूर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम

 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.

पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरणाबाबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लसीकरण समन्वयक डॉ.अनिरुद्ध पिंपळे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.बिरुदेव दुधभाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 16 केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी ग्रामीण भागात बारा तर सोलापूर शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात एक तर माळशिरस तालुक्यात दोन केंद्रे असणार आहेत. लसीकरणाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. लसीकरणासाठी 599 लसटोचक नियुक्त करण्यात आले असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पाच जणांचे पथक असणार आहे. तसेच एक निरीक्षक आणि एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनायझेशन मॅनेजमेंट ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविड शिल्ड लस मिळणार आहे. आज संध्याकाळपर्यंत लस सोलापुरात पोहोचेल. सोलापुरसाठी 34 हजार डोसेस उपलब्ध होणार आहेत. या लस जिल्हा लस भांडार येथे साठवण्यात येणार आहेत. त्यासाठी शासकीय रुग्णालय परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बर्ड फ्लूबाबत नागरिकांनो घाबरू नका

जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्यूबाबत जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग पूर्ण सज्ज आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पक्षामध्ये बर्ड फ्लू सदृश्य लक्षणे आढळून आलेली नाहीत, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले आहे.

कोणत्याही प्रकारचा पक्षी मृत झाल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे. त्या पक्षाचे स्वॅब, रक्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, वित्त आणि लेखा अधिकारी अजयसिंह पवार, पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, विशाल बडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *