Headlines

मॉन्सूनच्या संभाव्य आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या सूचना


सोलापूर दि. 15 : येणाऱ्या मॉन्सूनमधील संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क असणे आवश्यक आहे. याकरिता सर्व शासकीय यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करावे. याबाबतचे आराखडे अद्यावत करून संभाव्य नैसर्गिक आपत्तीची माहिती नागरिकांना तत्काळ मिळावी, यासाठी गाव व तालुका पातळीवर नागरिकांचे आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज दिल्या.
 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मॉन्सून पूर्वतयारी ची बैठक झाली.  या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री देशमुख म्हणाले, संभाव्य जिल्ह्यातील पूर परिस्थिती व आपत्ती नियंत्रणाबाबत सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी. संभाव्य पूर परिस्थिती उद्भवल्यास नदीकाठची गावे व परिसरातील लोकांना वेळीच सतर्क करण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. संभाव्य पूरपरिस्थितीपूर्वी नदी काठावरील गावांची पाहणी करावी. पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठा, नदीतील पाणी पातळी, धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग याची माहिती देण्यासाठी 24 तास पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत. यात अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, अधिकारी कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक अद्यावत करावेत.
सार्वजनिक बांधकाम विभागानेही दक्षता घ्यावी. विद्युतपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी.  पूर परिस्थिती उद्भवल्यास यामध्ये आरोग्य विभागाची जबाबदारी महत्त्वाची असून साथीचे रोग व संसर्गजन्य आजार होणार नाही, यासाठी गावांमध्ये, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी पुरेसा औषधांचा साठा ठेवावा. याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रानेही तयारी करावी. या ठिकाणी नियंत्रण कक्ष 24 तास ठेवावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीचे नियोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील अव्वल कारकून अजित कांबळे, चंद्रकांत हेडगिरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *