Headlines

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – संभाजी भिडे यांची भेट खेदजनक

सांगली – पूरपरिस्थिती पहाण्यासाठी सांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी समाजात विष पेरणाऱ्या संभाजी भिडे यांना भेट दिल्याचे वृत्त आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत आहे.

कोरोनाशी वैज्ञानिक दृष्टीने हात करण्यात पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयी चुकीची, बेलगाम आणि जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारी विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांची भेट घेणे अत्यंत खेदजनक आहे. या आणि इतर विधानांनी हे विद्याविरोधी गृहस्थ अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला वारंवार आव्हान देत आले आहेत.

२०१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे दलित आणि दलितेतर समाजात वितुष्ट निर्माण करून सामाजिक सौख्याचे पालन करणाऱ्या महाराष्ट्रधर्माला भिडे यांनी चूड लावली. या एकाच गुन्ह्यासाठी त्यांची भीमा-कोरेगावच्या नजीकच असलेल्या येरवडा तुरूंगात रवानगी करायला पाहिजे होती.

महाराष्ट्रातील तुरूंगात निरपराध वयोवृद्ध विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते मृत्यूमुखी पडत असताना त्यांच्या छळाला कारण ठरलेल्या भिडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आश्वासन दिले, हे जनतेला समजले पाहिजे. खरे तर याबद्दल भिडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे.

सांगली दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी या विद्याविरोधकाचे पाय धरले होते. या भेटीत नेमके कुणी कुणाचे पाय धरले, हे समजायला हवे.

भाजपच्या देवेंद्र फडणविसांचाच अजेंडा उद्धव ठाकरे राबवणार नाहीत, आणि महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलाशी प्रतारणा करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.असे मार्क्सवादी कमुनिट्स पक्षाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *