Headlines

मालवाहू ‘एस.टी’ ची विश्वासार्ह सेवा; लालपरीचं असंही ‘संजीवन’ रुप


मालवाहू बसच्या ५४३ फेऱ्या; ३ हजार टन मालवाहतूक


९० हजार किलोमीटरचा प्रवास; २१ लाख रुपयांचे उत्पन्न

मुंबई दि. १२:  महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय लालपरी ‘एस.टी.’ ने आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेतली असून विश्वासार्हता आणि सुरक्षितता या द्विसूत्रीमुळे एस.टीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परिणामी एस.टी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे. २१ मे पासून आजपर्यंत मालवाहतूक एस.टीने ५४३ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपऱ्यात केली असून त्यासाठी ९० हजार कि.मीचा प्रवास करून  त्यापोटी महामंडळाला २१ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास महामंडळाने मान्यता दिली असून आतापर्यंत ७२  बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रुपांतरित) कार्यरत असून आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

सर्वसामान्यांच्या सेवेत सदैव तत्पर

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एस.टी महामंडळाच्या बसगाड्यांकडे पाहिले जाते. ‘गाव तिथे एस.टी’असा जिचा आदराने उल्लेख केला जातो त्या एस.टी ने अगदी लॉकडाऊनच्या काळात ही आपला सेवाभाव जपत परराज्यातील ५ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवले. तब्बल १५२ लाख कि.मीचा प्रवास या बसेसने केला. सर्वसामान्यांच्या प्रवासी सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या लालपरीने प्रवाशी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकीत पदार्पण केले असून त्याचा लाभ कोरोनाच्याकाळात सर्वाधिक झाला. एस.टीची थांबलेली चाके मालवाहतूकीसाठी राज्यभर धावली.

जुन्या एसटी बसगाड्यांमध्ये बदल

राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या बसगाड्यांमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्यकते नुसार जुन्या एसटी बसमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू  वाहनांत  करण्यात येत आहे. ज्या प्रवासी वाहनांचे विहित आयुर्मान  (साडेसहा लाख किमी आणि दहा वर्षे पूर्ण)  पूर्ण झाले  आहे, अशा प्रवासी वाहनांच्या अंतर्गत रचनेत बदल करून ही वाहने मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या दिनांक १८ मे २०२० रोजीच्या मान्यतेनंतर रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून मालवाहतूक बसचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य, बि-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाईप, रंगाचे डबे, अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एस.टीमधून केली जात आहे.

मालवाहतूकीला पाठबळ

एसटी महामंडळाचे राज्यात २५० आगार आहेत. यातील अनेक आगारे ही तालुकास्तरावर कार्यरत असून त्याबरोबर ३१ विभागीय कार्यालये, ३३ विभागीय कार्यशाळा असा महामंडळाचा मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.


मालवाहतूकीसाठी स्वतंत्र कक्ष

एसटीने सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर मालवाहतुकीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून त्यांच्यामार्फत एमआयडीसी,कारखानदार, लघुउद्योजक, कृषिजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाचे अनेक महामंडळे,व्यापारी आपला माल एसटीच्या मालवाहतूक सेवेतून  पाठविण्यास उत्सुक आहेत. पुणे, नाशिक, सातारा, सांगली,जळगांव, गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *