Headlines

congress nitin raut on bharat jodo yatra incident right eye injury incident

[ad_1]

बुधवारी काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे डोळ्याला गंभीर दुखापत झालेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये नितीन राऊत यांना ही गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राऊत यांच्यावर हैदराबादमधील वासवी रुग्णालयात उपचारदेखील करण्यात आले. रुग्णालयातील त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत असून आता खुद्द नितीन राऊत यांनीच नेमकं काय घडलं होतं, याविषयीचा घटनाक्रम सांगितला आहे.

नितीन राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली. “भारत जोडो यात्रा जेव्हा सुरू झाली, तेव्हापासून मी त्या यात्रेत सहभागी झालो नव्हतो. मध्यंतरी मी आजारी असताना जाऊ शकलो नाही. नंतर थोडं बरं वाटल्यावर मला वाटलं तिथे जावं. त्यामुळे हैदराबादला यात्रेत सहभागी व्हायला मी गेलो होतो. विमानतळावर उतरल्यानंतर मी सरळ इंदिरा गांधींच्या पुतळ्याच्या ठिकाणी कार्यक्रमा होता, तिथे गेलो होतो”, अशी माहिती राऊत यांनी दिली.

“पाच किलोमीटर चालत कार्यक्रमस्थळी पोहोचलो”

“ट्रॅफिक जाम असल्यामुळे मी जवळपास पाच किलोमीटर चालत इंदिरा गांधींच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. स्टेजच्या जवळ पोहोचलो तेव्हा नेमका राहुल गांधींचा ताफा तिथे दाखल झाला. तिथे गर्दी खूपच जास्त होती. पोलिसांना काय झालं माहिती नाही. ते अचानक लोकांवर तुटून पडले. जमलेल्या लोकांना बाजूला करायला लागले”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“२२ मिनिटं रक्तस्राव होत होता, पण कुणीच आलं नाही”

“मी कोपऱ्यात होतो. तरी मला छातीवर हात ठेवून स्वत: एसीपी आणि चार लोकांनी जोरात धक्का दिला. समोरून ढकलल्यामुळे मला डोक्यावर लागणार असं वाटत असतानाच मी स्वत:ला सावरलं. त्या प्रयत्नात मी उजव्या बाजूला रस्त्यावर पडलो. मला डोळ्याला जोरात मार लागला. तिथे रक्तस्राव सुरू झाला. २२ मिनिटं रक्तस्राव सुरू होता. पण कुणीही आलं नाही. पोलीसही आले नाहीत. कार्यकर्त्यांनी घेराव घातला”, असा दावा राऊत यांनी केला.

“अल्पसंख्य विभाग आणि अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांनी मला सावरलं. थंड पाण्याची बाटली एकानं दिली. ते पाणी डोक्यावर टाकलं. तरी रक्तस्राव थांबला नाही. त्या ताफ्यातच एक अॅम्ब्युलन्स होती. त्यात मला प्राथमिक उपचार देण्यात आले. ते म्हणाले ‘रक्तस्राव थांबत नाही. तुम्ही तातडीने रुग्णालयात जा’. जवळपास दीड ते दोन किलोमीटर पायी गेल्यानंतर आम्ही चहाच्या एका टपरीवर ‘कुणाकडे गाडी आहे का?’अशी विचारणा केली. तेव्हा तो बाईक घेऊन आला. त्या बाईकवर ते मला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचार झाले”, असंही राऊत यांनी सांगितलं.

‘भारत जोडो यात्रे’त नितीन राऊत यांना धक्काबुक्की, डोळ्याला गंभीर दुखापत

डोळ्याला जबर मार आणि हेअरलाईन फ्रॅक्चर

“उजव्या डोळ्यावर मला जबर मार लागला आहे. आतमध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर झालं आहे. पण डोळा वाचला”, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. तसेच, “मी रुग्णालयात जाईपर्यंत राहुल गांधी, वेणुगोपाल राव, मल्लिकार्जुन खर्गे यांचा मला फोन आला. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मला भेटायला आले”, असंही त्यांनी सांगितलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *