Headlines

नवीन पिक कर्जाचे तातडीने वाटप करा ,महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांना आ. नमिता मुंदडांच्या सूचना

 केज/अमर पाठक –  विविध संकटांचा सामना करत शेतकरी खरीप हंगामाला सामोरे जात असताना बँकांकडून मात्र त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वारंवार खेटे मारूनही बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज देण्यात यावे, विशेषतः नव्या पिक कर्जाचे तातडीने वाटप करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीक कर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही.  धान्य विकल्यानंतर कर्ज देणार का असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. यासंदर्भात आ. मुंदडा यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस बँकेचे बीड जिल्हा प्रमुख  कुलकर्णी यांच्यासह मतदार संघातील सर्व शाखांचे व्यवस्थापक हजर होते. मागील २०-२५ वर्षात महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे जी गावे दत्तक आहेत तिथे एसबीआयने मोठ्या प्रमाणात पिक कर्ज दिले. यंदा मात्र त्यांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत एसबीआयकडे असणारे शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे वळल्यामुळे ताण वाढला आहे. ग्रामीण बँकेचे जुने आणि एसबीआय कडून आलेले नवे शेतकरी मिळून मोठी संख्या होत असल्यामुळे कर्जवाटपास उशीर होत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अखेर चर्चेअंती मुंदडा यांनी कालबद्ध नियोजन करून जुन्या पिककर्जासह नवीन शेतकऱ्यांना देखील कर्जाचे वाटप करावे अशा सूचना केल्या. बँक अधिकाऱ्यांनी सूचना मान्य करत तातडीने यावर कार्यवाही करू असे सांगितले. शेतकऱ्यांना हेलपाटे कमी करण्यासाठी निश्चित वार ठरवून देऊन त्यादिवशी त्यांची कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.  
‘एसबीआय’ने पीक कर्जाचे वाटप करणे सोयीचे 

सदरील गावातील एसबीआय कडून येणारे शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी नवीन असल्याने त्यांची पीक कर्ज वाटप प्रक्रिया संपूर्णतः नव्याने करावी लागणार आहे. हे वेळखाऊ आणि बँक, शेतकऱ्यास त्रासदायक आहे. ‘एसबीआय’ने पूर्वीप्रमाणे कर्जवाटप केले तर त्यांना फक्त नूतनीकरणाची प्रक्रिया पार पाडावी लागेल. हे काम सोपे आणि जलद होणारे असल्याने एसबीआय बँकेला कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत असे आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच, जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध शाखात मनुष्यबळाची कमतरता असून प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरावीत असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *