Headlines

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली

 


नवी दिल्ली /16 फेब्रुवारी


सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुसनिमित्त केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली. सहिष्णुता आणि सौहार्द्रता हा भारताचा डीएनए आहे आणि आपल्या देशाचा हा अभिमानास्पद वारसा कोणीही “बदनाम किंवा उध्वस्त” करू शकत नाही असे नक्वी यांनी सांगितले.

यावेळी नक्वी यांनी पंतप्रधानांचा संदेश वाचला ज्यात त्यांनी वार्षिक उरुसाच्या निमित्ताने भारत व परदेशातील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना अभिवादन आणि शुभेच्छा दिल्या.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुस निमित्त जगभरातील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना अभिवादन आणि शुभेच्छा. हा वार्षिक उत्सव हे सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचे एक सुंदर उदाहरण आहे. विविध धर्म, पंथ आणि त्यांच्याशी संबंधीत श्रद्धा यांचे सुसंवादी सह-अस्तित्व हा आपल्या देशाचा एक भव्य वारसा आहे. या वारशाच्या जतन आणि संरक्षणात आपल्या देशातील विविध संत, पीर आणि फकीर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या शांतता आणि सलोख्याच्या संदेशामुळे आपला सामाजिक-सांस्कृतिक वारसा नेहमीच समृद्ध झाला आहे.”

पंतप्रधानांनी आपल्या संदेशामध्ये असे म्हटले आहे की, “सुफी विचारांनी समाजात अमिट छाप उमटवणारे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे आपल्या महान आध्यात्मिक परंपरेचे आदर्श प्रतीक आहेत. प्रेम, ऐक्य, सेवा आणि सौहार्द यांना प्रोत्साहन देणाऱ्या गरीब नवाजची मूल्ये आणि मते मानवतेसाठी नेहमी प्रेरणा देतील. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या वार्षिक उरुसानिमित्त मी अजमेर शरीफ दर्गा येथे “चादर” सुपूर्द करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतो आणि देशाच्या सुख, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.


गरीब नवाज यांचे जीवन आपल्याला जातीय आणि सामाजिक समरसतेची वचनबद्धता दृढ करण्यासाठी प्रेरणा देते. हे ऐक्य समाजात फूट आणि संघर्ष निर्माण करण्याच्या कटात गुंतलेल्या शक्तींना नेस्तनाबूत करू शकते. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा संदेश “जगभरातील शांततेसाठी प्रभावी बांधिलकी” आहे असे नक्वी यावेळी म्हणाले.


नक्वी यांच्या हस्ते दर्गा परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या 88 शौचालयांचे उद्घाटनही करण्यात आले ज्यामुळे भक्त आणि यात्रेकरू विशेषत: महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. 500 महिला यात्रेकरूंसाठी निवास व्यवस्था असणाऱ्या “रेन बसेरा” चे उद्घाटन त्यांनी केले. दर्गा आवारात पहिल्यांदाच या सुविधा बांधण्यात आल्या आहेत.


नक्वी यांच्या हस्ते दर्ग्याच्या गेट क्रमांक 5 चे उद्‌घाटन झाले आणि त्यांनी दर्गा परिसरातील गेस्ट हाऊसच्या चौथ्या मजल्याचे उद्‌घाटनही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *