Headlines

‘…म्हणून मला राजकारणात जाता येत नाही’, नाना पाटेकरांनी मांडले स्पष्ट मत

[ad_1]

Nana Patekar On Politics : मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ओळखले जाते. ते कायमच राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. गेल्या काही काळापासून नाना पाटेकर हे राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण आता त्यांनी यावर स्पष्टपणे नकार दिला आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींबद्दल टीकाही केली. 

गेल्या महिन्याभरापासून अनेक शेतकरी संघटना दिल्लीजवळच्या शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहेत. किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावासाठी कायदा करावा ही या सर्व शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारने घेतलेल्या भूमिकेवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये आयोजित शेतकरी साहित्य संमेलनादरम्यान बोलत होते. 

“…तर मला त्या पक्षातून बाहेर काढतील”

“सरकारकडे मागू नका, कोणते सरकार करायचं हे ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही, कारण माझ्या पोटात जे आहे तेच माझ्या ओठावर येते. मी जर असं केलं तर मला त्या पक्षातून बाहेर काढतील. महिनाभराने सर्व पक्ष संपलेले असतील. त्यामुळे मग कशाला तिथे जायचं? त्यापेक्षा इथे मनापासून सर्व बोलता येते”, असे नाना पाटेकर म्हणाले. 

“सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण मरणार आहोत, हे यांना कधी कळणार आहे. किती संचय करायचा. मृत्यू आहे, तो अटळ आहे. तुम्हाला माहिती नाही का? अमर असल्यासारखे का वागता तुम्ही? काय बोलता?  तुम्ही आमच्या नवीन पिढीसमोर काय आदर्श ठेवणार? रोज आपल्याला अन्न देणाऱ्याची जर तुम्हाला किंमत नसेल, तर मग आम्ही तुमची किंमत का ठेवायची?” असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. 

“पुढचा जन्म मी शेतकरी म्हणून घेईन”

“जरी मी आत्महत्या केली तरी पुढचा जन्म शेतकरी म्हणून घेईन. पुढचा जन्म मला शेतकरी म्हणून नको असा कोणताच बळीराजा बोलणार नाही. आपण जनावरांची भाषा ओळखतो, तर तुम्हाला शेतकऱ्यांची भाषा त्यांचे प्रश्न का समजत नाही.” असेही ते यावेळी म्हणाले. 

दरम्यान नाना पाटेकर हे ‘ओले आले’ या चित्रपटात झळकले होते. यात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांच्याबरोबर मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर व सायली संजीव यांनी स्क्रिन शेअर केली आहे. त्याबरोबरच ते आता लवकरच ‘सस्पेक्ट’, ‘दी कन्फेशन’ यासारख्या अनेक चित्रपटात झळकणार आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *