Headlines

सोयाबीनचे भाव कोसळले ; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

[ad_1]

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : अल्पभूधारक अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळीदेखील अंधारात गेली. दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी आणले. आवक वाढल्याने व शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन ओलाव्याच्या नावावर व्यापाऱ्यांकडून भाव पाडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली. त्यामुळे ऐन सणासुदीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी चार लाख ८३ हजार ५०० हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील सर्वाधिक दोन लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल आता सोयाबीनकडे आहे. यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीमध्ये पाणी साचले. त्यातच परतीच्या पावसानेदेखील झोडपून काढले. परिणामी, पिकांवर दुष्परिणाम झाला. नैसर्गिक संकटांशी तोंड देताना शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादन घेतले. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली, तर असंख्य शेतकऱ्यांना अद्यापही त्याची प्रतीक्षा आहे. विमा कंपन्यांकडूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळी सारख्या मोठय़ा सणाचा खर्च कसा भागवावा? या विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढून ते बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणले, मात्र त्या ठिकाणीदेखील शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला.

साधारणत: ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन काढले जाते. दिवाळीदेखील ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात आल्याने सोयाबीन काढून ते विक्री करण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. दिवाळीच्या तोंडावर बाजारात सोयाबीनची प्रचंड आवक वाढली. सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. त्यातच २० ऑक्टोबपर्यंत जिल्ह्यात परतीचा पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनमध्ये ओलावा कायम होता. २० टक्क्यांपर्यंत ओलावा असलेल्या सोयाबीनला धनत्रयोदशीच्या दिवशी ३२०० ते ३४०० रुपयांचाच दर मिळाला. या महिन्याच्या सुरुवातीला ४३०० ते ५१०० रुपये दरम्यान सोयाबीनचा दर होता. दिवाळीच्या दोन ते तीन दिवस अगोदर तोच दर ३२०० ते ५१०० दरम्यान आला. कुटुंबाची दिवाळी आनंदात जावी म्हणून पैशांची जुळवाजुळव करण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न होते. शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन काही जणांनी त्याचा गैरफायदा घेतला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनमध्ये ओलावा होता. त्यामुळे पातूर, बाळापूर भागात सोयाबीनची ३२०० ते ३५०० दरम्यान अल्पदराने खरेदी करण्यात आली. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचा विक्रीचा व्यवहार होऊन १० हजार अग्रिम व उर्वरित पैसे दिवाळी झाल्यानंतर असेदेखील प्रकार शेतकऱ्यांसोबत घडले आहेत. अतोनात प्रयत्न करून ही दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात सोयाबीनचे पैसे आले नाहीत. काही शेतकऱ्यांना नाइलाजाने अत्यल्प दरात सोयाबीन विकावे लागले. सोयाबीनच्या भावाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळय़ात पाणी आणल्याचे विदारक चित्र अनेक भागांत होते.  

सणासाठी व्याजाने पैसे : दिवाळी साजरी करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांची भिस्त सोयाबीन होती. सोयाबीन काढून ते विक्री केल्यावर आनंदात दिवाळी साजरी होईल, असे नियोजन बळीराजाकडून करण्यात आले. मात्र, परतीचा पाऊस, सोयाबीनमधील ओलावा, बाजारपेठेतील प्रचंड आवक, सोयाबीनचा पडलेला भाव या सर्व कारणांमुळे सोयाबीनचा पैसा शेतकऱ्यांच्या हातात पडला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी सावकारांचे उंबरठे झिजवून व्याजाने पैसे घ्यावे लागल्याचे गंभीर चित्र ग्रामीण भागात होते.

सोयाबीन विक्रीनंतर आनंदात दिवाळी साजरी करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा होती, मात्र पावसाचा फटका व व्यापाऱ्यांकडून ओलाव्याच्या नावावर अल्पदरात सोयाबीन खरेदी करण्यात आल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची निराशा झाली. असंख्य शेतकऱ्यांना नुकसानभरपाईदेखील मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले.

डॉ. प्रकाश मानकर, अध्यक्ष, भारत कृषक समाज.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *