Headlines

‘…तर भारताला वेड लागायची वेळ आली असती’; राज ठाकरेंनी आशा भोसलेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

[ad_1]

Raj Thackeray on Asha Bhosale 90th Birthday: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. आशा भोसले यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे त्यांचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबात जन्म, लहानपणापासून संगीताचा वारसा आणि आपल्या कलेवर अपार प्रेम करणाऱ्या आशा भोसले यांनी नव्वदी पार केली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

यावेळी राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की : 

आज आशाताईंचा नव्वदावा वाढदिवस. मागचं शतक अद्वितीय होतं, काय माणसं जन्माला आली त्या शतकांत. प्रतिभा ओसंडून वाहत होती असं वाटावं इतकी ती चहुबाजुंनी समोर येत होती. त्या प्रतिभेचे दोन सर्वोच्च आविष्कार म्हणजे लता दीदी आणि आशा ताई. त्यात दीदींचा आवाज तुम्ही कुठेही ऐकलात तरी क्षणात आत, खोल नेणारा, कुठेतरी मुळापासून गदागदा हलवणारा, घुसळून टाकणारा, खोल आत नेऊन त्याच्याशी सख्य करायला लावणारा.    

पण आशाताईंचा आवाज मात्र तुम्हाला जमिनीवर आणतो, पुन्हा मर्त्य जगात आणतो. माणूस म्हणला की प्रेम, वासना, झुगारून देणं, तडफडण हे सगळं आलंच, ह्या प्रत्येक भावनेचा आविष्कार आशाताईंच्या आवाजातून प्रकट होताना दिसत राहिला. 

म्हणून मी नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, भीमसेन अण्णा, किशोरीताई आमोणकर, कुमार गंधर्व ह्यांच्यासारखे दैवीस्पर्श लाभलेले, तसंच अनेक गुणी संगीतकार, लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, शिल्पकार, हे जर भारतात जन्मले नसते तर भारताला वेड लागायची वेळ आली असती. 

अतिशयोक्ती वाटेल, पण ही माणसं होती, त्यांची कला होती म्हणून आसपास इतक्या वाईट गोष्टी घडताना पण जगण्याचं बळ मिळालं. अन्यथा ह्या देशात अराजकच माजलं असतं. 
 
वर म्हणलं तसं तो प्रतिभा ओसंडून वाहण्याचा काळ होता, आता ते सगळं कुठेतरी रितं झाल्यासारखं वाटतंय. पण काळ असाच असतो. हे रितेपण किती, तर आज देखील संगीताचे जे काही शोज टीव्हीवर दिसतात, त्यात जी गाणी गायली जातात ती देखील त्याच काळातील, ह्याच गायक आणि संगीतकारांची असतात. ह्यावरूनच ह्या गायक आणि संगीतकारांपुढे किती मोठं आव्हान आहे हे जाणवतं. 
अर्थात ह्या रितेपणाचं दुःख मला नाही कारण मी ह्या दोघींना ऐकलं आहे, अनुभवलं आहे आणि प्रत्यक्ष असंख्य वेळा पाहिलं आहे. जर पुन्हा भारतात कधी प्रतिभेचा बहर येणार असेल, तर ज्या माणसांच्या रूपाने तो बहर येईल, त्यांचा पिंड आशाताईं सारख्यांच्यामुळेच घडेल ह्याबद्दल शंकाच नाही. 

आशाताई नव्वद इत्यादी आकडे हे सामान्यांसाठी असतात, तुम्हाला ‘शंभरीपार’ला पर्याय नाही. आशाताईंना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे नाते 

पंडित दिनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर यांच्या पोटी आशा भोसले यांचा जन्म झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर त्यांची मोठी बहीण. तर उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर ही त्यांची भावंडं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे नातेही तितके खास आणि वेगळे. एकाच इंडस्ट्रीत असूनही या दोन बहिणी एकमेकींशी स्पर्धा करतात असे वाटूच नये. एकमेकींकडून सदैव शिकणे, एकत्र राहणे आणि आदर करणे अशा या दोन बहीण. मागच्या वर्षी लता मंगेशकर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात मंगेशकर कुटुंबियांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात आशा भोसले यांना लता मंगेशकर यांच्या आठवणी आठवताना रडू कोसळले होते.

लता मंगेशकर यांच्या आयुष्याला, कर्तृत्त्वाला त्यांनी ‘न भूतो न भविष्यति’ असं म्हटले होते. त्यांनी यावेळी एक आठवण सांगितली होती ती अशी की, ”लहानपणीचं दीनानाथ मंगेशकरांचे निधन झाले आणि त्यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांच्या आईचेही निधन झाले. आपल्या भावंडांसाठी लता मंगेशकर यांनी इतक्या लहान वयातच भावंडांची जबाबदारी सांभाळली. ज्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांना एका चादरीत गुंडाळून औषधोपचारासाठी नेण्यात आले होते. आपल्या वडिलांना मृत्यूसमयी इतकी हालअपेष्टा सहन करावी लागली त्यानंच लता मंगेशकर यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालय उभारण्याची प्रेरणा दिली. लतादीदींना आपल्या आडनावावर फार अभिमान होता. त्या कधीही फोनवर बोलताना सांगत की, मी ‘लता दिनानाथ मंगेशकर’. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *