Headlines

NCP responsible BJP coming to power in the state Prithviraj Chavan ysh 95

[ad_1]

कराड : राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे माध्यमांशी बोलताना केला.  कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, की राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकारचे काम चांगले होते. परंतु या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी कॉग्रेस सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत हे सगळय़ांना समजले, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडल्यामुळे ‘जी २३’चा मुख्य हेतू सफल झाला. पण, निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये २२ वर्षांनंतर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. तशी आमची मागणी होती.  आम्ही ती लावून धरली नसतीतर कदाचित अजूनही अशा निवडणुका झाल्या नसत्या. नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगले काम करतील. हिमाचल प्रदेश, गुजरात राज्यांच्या निवडणुकांसह येत्या लोकसभा निवडणुकीला काँग्रेस नियोजनाने समोरे जाईल असा विश्वास चव्हाण यांनी दिला.

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ म्हणजे ‘मोदी हटाव यात्रा’ आहे. मोदी पंतप्रधानपदावर असेपर्यंत देशात दूषित वातावरण राहणार असल्याने बदलाची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसला येत्या निवडणुका जिंकाव्याच लागतील असे चव्हाण म्हणाले.  ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यात सहभागी होणार का? याबाबत विचारले असता त्यांना निमंत्रण दिले गेले आहे. ही यात्रा तिरंगा झेंडय़ाखाली होत आहे. पण यात सहभागी व्हायचे की नाही हा त्यांचाच निर्णय असेल असे चव्हाण यांनी सांगितले.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *