Headlines

“महाराष्ट्रातील हवामान खराब असल्याने…”, ‘टाटा-एअरबस’वरून जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला टोला |NCP leader Jitendra Awad’s criticism of the state government from Tata Airbase

[ad_1]

ठाणे : महाराष्ट्रातील हवामान कदाचित खराब असल्यामुळे एअरबस-टाटा प्रकल्पाचे विमान गुजरातमध्ये उतरविण्यात आले असावे, अशी उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारला लगावला. वेदांता प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांसाठी एअरबस-टाटा प्रकल्प येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासित केले होते. पण, आता हाही प्रकल्प गेला असून त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नोटांवर कुणाचे फोटो असावेत या विषयावर चर्चा होण्याऐवजी रुपयाचा घसरलेल्या दरावर चर्चे होणे अपेक्षित असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

देशाच्या कोणत्याही राज्यातील नागरिक महाराष्ट्रात आला तर, त्याच्या पोटापाण्याची सोय अवघ्या २४ तासात होत होती. हा महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म आहे. या मातीने कुणालाही उपाशी झोपू दिले नाही. पण, आता याच मातीतील तरुणांना उपाशी झोपावे लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बेरोजगारी हा विषय राज्यकर्त्यांनी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मतही आव्हाड यांनी व्यक्त केले. इंग्लडमध्ये भाववाढ झाली तर, तेथील पंतप्रधानांनी राजीनामा दिला. आपल्याकडे इतकी संवेदनशीलता अपेक्षित नाही. पण, वेदांता प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांसाठी एअरबस-टाटा प्रकल्प येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासित केले होते. पण, आता हाही प्रकल्प गेला असून त्यावर सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : ठाण्याहून भिवंडीकडे निघालेल्या एसटी बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे ७० प्रवाशी बचावले

भारतीय चलनातील नोटांवर देवीदेवतांचे फोटो असावेत, अशी मागणी आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली असून त्यांनी अशाप्रकारची मागणी कशासाठी केली हे त्यांनाच ठाऊक असेल. परंतु अशा विषयांवर चर्चा होणे अपेक्षित नसतानाही त्यावर चर्चा होताना दिसून येत आहे. मुळात नोटांवर कुणाचे फोटो असावेत, या विषयावर चर्चा करण्याऐवजी रुपयांचा दर का घसरला आणि त्याचे होणारे परिणाम या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्डेमय; सुस्थितीत रस्ते खोदून सेवा वाहिन्या टाकण्यास नागरिकांचा विरोध

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा” या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक,कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करुन लोकांना संभमित करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *